कॉंग्रेसचे ठरतेय काय, आघाडी की स्वबळावर?

पुणे – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. स्वाभाविकच यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तीनही पक्ष एकत्रितपणेच लढवतील असा अनेकांचा समज आहे. पण, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकतचे जाहीर केले की, “कॉंग्रेस पक्ष मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरा जाईल.’ असे असेल तर, पुण्यात काय करणार? खरंच कॉंग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी जाईल का? अशी चर्चा आहे.

कॉंग्रेसचा वर्धापनदिन नुकताच कॉंग्रेस भवनात साजरा झाला. त्यावेळी काहींनी पुणे महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. वर्धापनदिनाच्या उत्साही वातावरणात असा निर्धार करणे साहजिकच होते. त्याला प्रतिसादही मिळाला. ही भावनिकता असेल, तर चांगलेच पण राजकारणाला अनेक पदर आहेत, त्याचाही विचार करावा लागेल.

2017च्या महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आघाडी करताना खूप घोळ घातला होता. कॉंग्रेस पक्षातील एक गट “राष्ट्रवादीशी आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढू’ असे म्हणत होता. कॉंग्रेस पक्ष विस्कळीत झाला होता, त्याचा फायदा उठविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीने चार सदस्यांचा एक प्रभाग अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या होत्या. सक्षम उमेदवार मिळण्याची चिंता कॉंग्रेसपुढे होती.

पक्षाला एकमुखी नेतृत्व नव्हते. त्यामुळे प्रचारयंत्रणा उभी करणे कठीण झाले होते. पुण्याबाहेरच्या नेत्यांनी हस्तक्षेप करुन आघाडीची मोट बांधली होती. त्यातही जागावाटप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. त्यातही सर्व जागांचे वाटप झाले नाही. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. पक्षाच्या चिन्हावर नऊजण निवडून आले. हा अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसला आघाडी करून लढायचे की स्वबळावर? हे अगोदर ठरवावे लागेल. शिवाय महाविकास आघाडीत शिवसेना हा तिसरा पक्ष आहे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे जुने मित्रपक्ष आहेत. ते काहीवेळा एकत्र आले, काहीवेळा वेगळे लढले, पण हे त्यांचे आपापसांत सुरू होते.

आता पालिका निवडणुकीत आघाडी करायची ठरल्यास शिवसेनेलाही त्यांना सामावून घ्यावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेबरोबर कायम रहायचे ठरवले असून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना “शिवसेनेशी जुळवून घ्या’ असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत दिले आहेत. या राजकीय धोरणाचा विचारही कॉंग्रेस नेत्यांना पुण्यात अधिकच करावा लागेल. आघाडीत कॉंग्रेसच्या उद्दिष्टाला धक्का लागणार नाही, यासाठी संघटना मजबूत करावी लागेल आणि त्याचवेळी स्वबळावर लढायचे झाल्यास महापालिकेच्या 162 जागा लढवण्यासाठीची तयारी आतापासूनच करावी लागेल.

गांभीर्याने विचारविनिमय सुरू
कॉंग्रेस पक्ष यावेळी अधिक सक्रिय झाला आहे असे दिसते. काही ना काही निमित्ताने कॉंग्रेसचे स्थानिक नेते एकत्र येत आहेत. जुन्या कॉंग्रेसजनांना परत पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत आपली ताकद वाढविण्यासाठी गांभीर्याने विचारविनिमय सुरू आहे. वर्षभराचा कृती कार्यक्रम ठरवला जात आहे. त्यातून पक्षाला गतवैभव मिळवण्याचे प्रयत्न असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.