उदयनराजे भाजपात आले आणि पडले, त्यांचं योगदान काय?- संजय काकडे

पुणे: भारतीय जनता पार्टीकडून संजय काकडे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या चर्चेवर संजय काकडेंनी प्रश्न उपस्थित केले. राज्यसभेवर खासदार होण्यासाठी उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय? असे काकडे म्हणाले.
येत्या २ एप्रिलला महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये शरद पवार, हुसेन दलवाई ,मजीद मेमन, राजकुमार धूत या महाविकास आघाडीच्या खासदारांचा समावेश आहे. तर रामदास आठवले, संजय काकडे, अमर साबळे या भाजप नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु असताना. खासदार संजय काकडे यांनी आपण इच्छुक असल्याचे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे राज्यसभेच्या जागांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले संजय काकडे?
मी पक्ष संघटनेसाठी काय प्रयत्न केले आहेत, हे वरिष्ठांना माहिती आहे. मी पक्षाच्या उपयोगाचा आहे, असे त्यांना वाटत असेल तर ते माझ्या नावाचा नक्की विचार करतील. पुण्यातील विधानसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केले. तसेच पुणे महापालिकेत पक्षाची सत्ता आणण्यासाठी विविध योजना राबविल्या. त्यामुळे पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. उदयनराजे भोसले यांचं भाजपमध्ये फारसं योगदान नाही. ते पक्षात आले आणि निवडणुकीत पडले. त्यामुळं पक्ष त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई करणार नाही. केवळ छबी असल्याने पक्षाला उपयोग होतो असे नाही. जनाधार जेवढा दाखवला जातो तेवढा त्यांच्या मागे खरंच आहे का? याचा विचार व्हायला हवा.





