नवी दिल्ली – दुसर्या तिमाहित विकासदराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त म्हणजे 8.2% इतकी भरल्यानंतर देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असतानाच औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी मात्र कमालीची नकारात्मक असल्याची आकडेवारी सोमवारी उपलब्ध झाली. ऑक्टोबर मधील औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत केवळ 0.4 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या 13 महिन्यांमध्ये औद्योगिक उत्पादन इतक्या कमी प्रमाणात कोणत्याही महिन्यात झाले नव्हते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 3.7 टक्क्यांनी वाढले होते. तर सप्टेंबर 2024 मध्ये औद्योगिक उत्पादन स्थिर पातळीवर राहिले होते. दरम्यान या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादन 4.6 टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली आहे. सप्टेंबरनंतर औद्योगिक उत्पादन वेगाने कमी होऊन केवळ 0.4 टक्के इतके झाले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी 2.7 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर गेल्या वर्षी या कालावधीत औद्योगिक उत्पादन चार टक्क्यांनी वाढले होते. उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाले असताना विकासदराच्या आकडेवारीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात चा वाटा 9% पर्यंत वाढला असल्याच्या आकडेवारीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊर्जा उत्पादन वाढण्याऐवजी 6.9 टक्क्यांनी कमी झाले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊर्जा उत्पादन दोन टक्क्यांनी वाढले होते. ऊर्जेचा वापर कमी होत असतानाच इतर उत्पादनात मात्र वाढ झाल्याची आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नात जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर अनेक विश्लेषकांनी शंका घेतलेल्या आहेत.