Digital Currency of India: आता खिशात नोटांची गरज नाही! जाणून घ्या काय आहे RBI चे ई-रुपये, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत
Digital Currency of India: हा डिजिटल रुपया म्हणजे तुमच्या खिशातील कागदी नोटा आणि नाण्यांचे डिजिटल स्वरूप आहे. अनेकदा लोक याला बिटकॉइन किंवा यूपीआय (UPI) समजतात, परंतु हे पूर्णपणे वेगळे आहे.

Digital Currency of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल क्रांतीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत ‘डिजिटल रुपया’ (Central Bank Digital Currency – CBDC) लाँच केला आहे. हा डिजिटल रुपया म्हणजे तुमच्या खिशातील कागदी नोटा आणि नाण्यांचे डिजिटल स्वरूप आहे. अनेकदा लोक याला बिटकॉइन किंवा यूपीआय (UPI) समजतात, परंतु हे पूर्णपणे वेगळे आहे. ई-रुपया नक्की काय आहे, तो कसा मिळवायचा आणि त्याचे नियम काय आहेत? याबाबात सविस्तर जाणून घेऊया..
ई-रुपया आणि बिटकॉइनमधील फरक –
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ई-रुपया ही ‘क्रिप्टोकरन्सी’ आहे का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. ई-रुपया हे सरकारी गॅरंटी असलेले कायदेशीर चलन (Legal Tender) आहे, तर बिटकॉइनला सरकारची मान्यता नाही. बिटकॉइनचे मूल्य सतत कमी-जास्त होते, मात्र ई-रुपयाचे मूल्य तुमच्याकडील रोख रकमेइतकेच स्थिर असते. ई-रुपया हा गुंतवणुकीचा प्रकार नसून पेमेंटचे सुरक्षित माध्यम आहे.
ई-रुपया आणि UPI मध्ये काय फरक आहे?
अनेकांना वाटते की ई-रुपया म्हणजे UPI आहे, पण तसे नाही. ई-रुपया स्वतः एक ‘चलन’ आहे, तर UPI हे पैसे ट्रान्सफर करण्याचे केवळ एक ‘माध्यम’ आहे. UPI साठी बँक खाते असणे अनिवार्य आहे, कारण ते एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवते. ई-रुपया वॉलेट एकदा लोड केले की, व्यवहारासाठी बँक सर्व्हरची गरज नसते. ₹५०,००० पेक्षा कमी खर्चाच्या ई-रुपये व्यवहाराची नोंद तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये येत नाही, जसे की आपण रोखीने खर्च करतो.
वापर कसा आणि कुठे करायचा?
ई-रुपयाचा वापर सामान्य नोटांसारखाच दैनंदिन गरजांसाठी करता येतो. तुमच्या बँकेचे ‘Digital Rupee’ ॲप प्ले-स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच सिम कार्डने रजिस्टर करा जे बँक खात्याशी लिंक आहे. तुम्ही व्यापाऱ्यांचा UPI QR कोड स्कॅन करूनही ई-रुपयाद्वारे पेमेंट करू शकता. सध्या एका वॉलेटमध्ये जास्तीत जास्त १ लाख रुपये ठेवता येतात आणि दिवसाला ५०,००० रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात.
ई-रुपयाचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्ये –
जसे घरी ठेवलेल्या रोख रकमेवर व्याज मिळत नाही, तसेच ई-रुपया वॉलेटमधील रकमेवरही व्याज मिळत नाही. याचे व्यवहार पूर्णपणे विनामूल्य आहेत. बँक यावर कोणतेही चार्जेस आकारत नाही. सध्या ई-रुपयावर कोणताही कॅशबॅक मिळत नाही, परंतु भविष्यात अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका रिवॉर्ड्स देऊ शकतात. सध्या यासाठी स्मार्टफोन आवश्यक आहे, मात्र भविष्यात कीपॅड फोनवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्याची RBI ची योजना आहे.
ई-रुपया उपलब्ध असलेल्या प्रमुख बँका –
SBI, ICICI, HDFC, IDFC First, Bank of Baroda, Kotak Mahindra, Axis, PNB आणि इतर प्रमुख १९ बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
दरम्यान, असे सांगितले जात आहे की, ई-रुपया हे भविष्यातील चलन आहे जे भौतिक नोटा छापण्याचा खर्च वाचवेल आणि व्यवहार अधिक सुरक्षित करेल. जर तुमचे खाते वरीलपैकी कोणत्याही बँकेत असेल, तर तुम्ही आजच ई-रुपया वॉलेट वापरून पाहू शकता.





