उष्माघात म्हणजे काय ? गरजेशिवाय बाहेर पडणे टाळा.. उन्हाळ्यात ‘अशी घ्या’ आरोग्याची काळजी

मुंबई – सध्या तापमान सातत्याने 40 अंशांच्या आसपास जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊन भोवळ येणे, उलट्या होणे, त्वचा लालसर होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे आदी उष्माघाताची लक्षणे दिसतात. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडा, अन्यथा घरातच राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना चटके लागत आहे. त्यामुळे नागरिकांना डीहायड्रेशन, ताप, चक्कर येणे, मळमळ होणे असा त्रास होत आहे. तसेच घरी बसले तरी उष्णतेचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
वाढत्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढून शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. परिणामी तहान लागणे, उलटी होणे, त्वचा लालसर होणे आदी लक्षणे जाणवू लागतात. अनेकदा उष्माघाताचा त्राउस होऊ लागतो. यामुळे घराबाहेर पडण्याची गरज असेल तरच बाहेर पडावे. बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली, डोक्यावर रुमाल किंवा छत्री आवश्यक असावी. तसेच शक्य झाल्यास कामे सकाळी किंवा सायंकाळी करुन घ्यावीत.
उष्माघात म्हणजे काय
मानवी शरीराचे तापमान 37 अंश असते. हवेचे तापमान 35 अंश किंवा त्यापेक्षा जास्त आणि सापेक्ष आर्द्रता 50 टक्क्यांपेक्षी जास्त असेल तर, शरीराला घाम येण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी शरीराचे तापमान वाढत जाऊन उष्माघाताचा त्रास होतो. थोकक्यात उष्णाघाताच त्रास हा फक्त वाढलेल्या तापमानावर नाही तर, हवेतील आर्द्रताही कारणीभूत असते.
उपाय
शरीरातली जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे. शरीर ओल्या कापड्याने पुसावे. बर्फ उपलब्ध असल्यास बर्फाचा शेक द्यावा. थंडाव्यामुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते.
लक्षणे
चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी आहेत. घाम बाहेर पडत नाही, त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढते. रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी येते, भ्रम होतो आणि बेशुद्धवस्था येते.





