अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारे चीनचे DeepSeek एआय काय आहे? जाणून घ्या

DeepSeek Ai : सध्या जगभरात DeepSeek एआयची चर्चा आहे. आतापर्यंत ChatGPT, Meta, Gemini, Microsoft Copilot या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटची चर्चा होत होती. मात्र, आता या सर्वांना मागे टाकत चीनच्या एआय मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या DeepSeek या नवीन एआय मॉडेलने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
या नवीन एआय मॉडेलची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, याचा परिणाम थेट जगभरातील शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे. डीपसीकने सध्या एआयमध्ये आघाडीवर असलेल्या अमेरिकन टेक कंपन्यांची झोप उडवली आहे.
डीपसीकच्या लोकप्रियतेमुळे एकाच दिवसात Nvidia Corp चे शेअर्स जवळपास 17 टक्क्यांनी कोसळले आहेत. कंपनीला एकाच दिवसात तब्बल 465 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले असून, 2020 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या शेअर्समध्ये एवढी प्रचंड घसरण झाली आहे.
DeepSeek Ai काय आहे?
डीपसीक हे एक एआय मॉडेल असून, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ChatGPT, Meta, Google Gemini, Microsoft Copilot या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटच्या तुलनेत अधिक प्रगत असल्याचा दावा केला जात आहे. हे मॉडेल 2023 मध्येच लाँच झाले होते. मात्र, याच्या DeepSeek-V3 या नवीन मॉडेलमध्ये अनेक नवीन वैशिष्टये देण्यात आली आहेत. त्यामुळे या एआयला अमेरिका, चीन आणि ब्रिटनमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.
लियांग वेनफेंग या तरूणाने या एआय मॉडेलची निर्मिती केली आहे. माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असलेल्या तरूणाने चीनच्या हांग्जो या शहरात एका कंपनीची स्थापना केली व त्याद्वारे डीपसीकची निर्मिती करत जगभरातील टेक कंपन्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सध्या अनेक देशांमध्ये अॅपलच्या अॅप स्टोअरवर हे टॉप-रेटेड ओपन सोर्स फ्री एआय अॅप बनले आहे.
डीपसीकचा दावा आहे की, Nvidia च्या कमी प्रगत H800 चिप्सचा वापर करून अवघ्या दोन महिन्यात व केवळ 6 मिलियन डॉलर्स खर्च करून हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, गुगल, ओपनएआयसह इतर प्रमुख अमेरिकन टेक कंपन्या एआयमध्ये पुढील काही वर्षात 1 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. कमी खर्चात अधिक प्रगत मॉडेल तयार केल्यानेच इतर टेक कंपन्यांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
DeepSeek-V3 मॉडेल इतर ओपन-सोर्स मॉडेल्सपेक्षा अधिक चांगले कार्य करते, असा दावा केला जात आहे. याचा वापर गणित, कोडिंग, नॅच्युरल लँग्वेज रिजनिंगसह वेगवेगळ्या कामासाठी केला जाऊ शकतो. अगदी कमी खर्चात या एआय मॉडेलची निर्मिती झाल्याने या क्षेत्रात अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता आहे.





