Wet Drought | राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडयात रविवार पासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकले आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. काही जिल्हयांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील राजकारणओला दुष्काळाच्या मुद्द्यावरुन तापले आहे. मात्र ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते? ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो? याबाबतची माहिती जाणून घेऊयात… दुष्काळाचे दोन प्रकार – दुष्काळाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सुका दुष्काळ आणि दुसरा ओला दुष्काळ. पाणी टंचाई निर्माण होते त्या परिस्थितीला सुका दुष्काळ असं म्हटलं जातं. या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीसाठीच्या पाण्यापर्यंत सर्वच प्रकारची टंचाई निर्माण होते. तर या विरुद्ध ओला दुष्काळ असतो. म्हणजेच अती प्रमाणात पाऊस झाला आणि त्याचा शेतीला फटका बसला तर त्याला ओला दुष्काळ असं म्हणतात. Wet Drought | ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. यात पिके पाण्याखाली जातात, जमिनीची पोषणतत्व धुवून निघतात. हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो. तसे पाहायला गेले तर, ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. शासन प्रामुख्याने ‘अतिवृष्टीग्रस्त’ किंवा ‘पूरग्रस्त’ भाग जाहीर करून मदत वितरीत करते. त्यामुळे ‘ओला दुष्काळ’ हा शब्द प्रचलित असला तरी, प्रत्यक्षात सरकार त्याऐवजी आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदींतर्गत मदत वाटप करते. Wet Drought | समजा, एकाच दिवशी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस असेल, तर त्याला अतिवृष्टी संबोधतात. तसेच या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास तो भाग ओला दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखता जातो. सध्याच्या सरकारी नियमांनुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागामध्ये कोरडवाहू शेतीसाठी प्रती हेक्टर १३ हजार रुपयांच्या आसपास मदत केली जाते तर बागायती शेतीसाठी १८ हजार प्रती हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते? संबंधित तालुक्यात 24 तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का ? 33% किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का ? महसूल विभाग कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात शेती शिवाय घर जनावरे रस्ते पाणीपुरवठा यावर झालेला परिणाम तपासला जातो. या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर केला जातो. शेतकऱ्यांना शासकीय मदत ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना शासकीय मदत दिले जाते. जसे की, साधारण 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. याशिवाय पीक कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा कर्जमाफी मिळते. सरकारी महसूल वसुली काही काळांसाठी थांबवली जाते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढविली जाते. नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळते. Wet Drought | हेही वाचा: माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा संदेश म्हणाल्या…