कोलकता हत्याप्रकरणात आरोपीची होणार पॉलीग्राफ चाचणी; नेमकं काय आहे? का केली जाणार चाचणी?

Polygraph Test | कोलकाता येथे घडलेल्या हत्याकांडाप्रकरणी आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी कोलकाता न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली दिली आहे. आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आरोपीची करण्यात येणारी पॉलिग्राफ चाचणी म्हणजे काय? ती का केली जाते? याबाबत जाणून घेऊयात.
पॉलिग्राफ चाचणी
पॉलिग्राफ चाचणीला ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ असेही म्हंटले जाते. एखादी व्यक्ती खरं की किती बोलतेय याची चाचपणी पॉलीग्राफ टेस्टमध्ये करतात. यात शारीरिक बदल तांत्रिक उपकरणांद्वारे तपासले जातात. त्यामुळे सदर आरोपी व्यक्ती किती खरं बोलतेय हे कळण्यास मदत होणार आहे.
साधारण १९२४ पासून पोलिस तपासात या चाचणीचा वापर केला जात आहे. पॉलिग्राफ चाचणीत व्यक्तीच्या शरीराशी चार ते सहा सेन्सर जोडले जातात. पॉलिग्राफ उपकरणात या सेन्सरच्या हालचाली नोंदवल्या जातात. यादरम्यान मशिनच्या स्क्रीनवर मानवी हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडी यांचं निरीक्षण केले जाते. चाचणीपूर्वीही व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर त्याचे हृदयाचे सामान्य ठोके, रक्तदाब, नाडीचे प्रमाण इत्यादी नोंदवले जातात.
पॉलीग्राफ चाचणीबाबत वाद –
पॉलीग्राफ चाचण्यांच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ही चाचणी न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकारली जात नाही. याशिवाय, काही लोकांना पॉलीग्राफ चाचणी दरम्यान तणाव किंवा चिंता वाटू शकते, ज्यामुळे परिणाम वेगळे दिसू शकतो.
पॉलिग्राफ चाचणी अचूक असते का?
पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी या दोन्ही चाचण्या वादग्रस्त आहेत आणि वैज्ञानिकदृष्टीने या चाचण्या १०० टक्के अचूक परिणाम देऊ शकतात, हे सिद्ध झालेले नाही. परंतु, तपास यंत्रणांनी त्यांच्या कामात या चाचण्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
पॉलिग्राफ चाचणीची गरज का? Polygraph Test |
आरोपी खरं की खोटे बोलत आहे, हे तपासण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी खूप उपयुक्त ठरू शकते. संजय रॉयचे दावे आणि आढळलेले पुरावे सुसंगत आहेत की नाही याची पुष्टी करण्यासाठी चाचणीचा वापर केला जाऊ शकतो. या चाचणीमुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
संजय रॉय कोण आहे? Polygraph Test |
९ ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर रुग्णालयात एका सेमिनार रूममध्ये बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. यातील प्राथमिक संशयित आरोपी संजय रॉय हा कोलकाता पोलिसांत नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. त्याला आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पोलिस चौकीत तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याला अटक करण्यात आली. तसेच पीडितेच्या मृतदेहाशेजारी एक ब्लूटूथ हेडसेट आढळले होते. जे त्याच्या फोनशी जोडले गेले. याप्रकरणी आरोपीने कबुली देखील दिली आहे.
हेही वाचा:
ED च्या अधिकाऱ्याने जीवन संपवलं की घातपात? रेल्वे रुळावर ‘मृतदेह’, घटनेच ‘मुंबई कनेक्शन’





