अजितदादांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय? पुण्यातील कार्यक्रमात ती आठवण सांगत शरद पवारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच जाहीर सभा, कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शरद पवार यांची स्तुती करणारी विधाने केली जात आहे. यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पुण्यात राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान आणि यशवंत क्लासेसतर्फे जागतिक मातृदिनानिमित्त मातृनाम प्रथम या कार्यक्रमाचे आयोजन सातारा रस्त्यावरील आण्णाभाऊ साठे सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असतानाची ती आठवण सांगितली.
शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणले, पवार साहेबांनी सांगितलं होतं की हे बिल मंजूर होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहिल, मला आठवते की सभागृह चार वाजेपर्यंत चालवले आणि महिला आरक्षणाचे बिल शरद पवार साहेबांनी मंजूर करून घेतले, अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.
या कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, वर्षा तापकीर, राणी भोसले, अश्विनी भागवत, योगेश शेलार, शितल पाटील, उज्वला पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
माझ्या चुलत्याच्या पुण्याईने….
बरामती येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा करण्यात आली. माझ्या आजोबाच्या, बापाच्या आणि माझ्या चुलत्याच्या पुण्याईने..माझं बरं चाललं आहे.! जे आहे ते आहे. त्यात काय घाबरण्यासारखे आहे. जे खर आहे ते खर आहे असे विधान केले होते. यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.





