विमान अपघात विमा म्हणजे नेमकं काय? किती खर्च येतो ?

Flight Accident Insurance | गुजरातमधील अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात होऊन विमानातील कर्मचाऱ्यांसह २४१ जण मरण पावले. या विमानाने उड्डाण करताच काही सेकंदातच ते कोसळले. विमान वाहतूक क्षेत्रातील दशकातील हा सर्वात भीषण अपघात ठरला. या घटनेतून पुन्हा एकदा विमान अपघात विम्याचे महत्त्व आणि त्यामध्ये कशाकशासाठी कव्हर मिळते याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.
विमान अपघात विमा
विमानाला अपघात झाल्यामुळे त्यातील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना विमान अपघात विमा उतरवला असल्यास आर्थिक भरपाई मिळते. प्रवाशांसाठी सुरक्षितता म्हणून विमा काम करतो. विमान अपघाताच्या प्रसंगात आर्थिक पाठबळासाठी विमान अपघात विमा महत्त्वाची कामगिरी करतो.
विमान अपघात विमा कव्हर
१) अपघाती मृत्यू – विमानाशी संबंधित अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाला तर एअरलाईन कंपनी वारसांना एकरकमी पैसे देते.
२) वैद्यकीय खर्च – विमान अपघातात प्रवासी जखमी झाला तर त्याला रुग्णालयातील उपचार, शस्रक्रिया आणि उपचारानंतरची काळजी यासाठीच्या तातडीच्या वैद्यकीय खर्चाची रक्कम विमा कंपनीकडून मिळू शकते.
३) अपंगत्व – विमान अपघात विम्यामध्ये ज्यांन कायमस्वरुपी अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व आले आहे, उदाहरणार्थ, पक्षाघात, अंधत्व अशा गोषटींसाठी देखील कव्हर मिळते.
काय गोष्टी कव्हर केल्या जातात?
पूर्ण प्रवासी विम्यामध्ये अनेक गोष्टींसाठी कव्हर मिळते त्यामुळे वेगवेगळ्या जोखमींपासून प्रवाशांचे संरक्षण होते. त्यामध्ये कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच ते दहा लाखांपर्यंत रक्कम, अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना २५ लाखांपासून ते एक कोटींपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते.
विमान प्रवासी विम्याचा खर्च
विमान प्रवासी विम्यासाठी तुलनेने कमी खर्च येतो. अगदी प्रतिदिन १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत प्रीमियम म्हणून भरावे लागतात. अर्थात ही रक्कम तुमचे प्रवासाचे ठिकाण आणि कव्हरची रक्कम यावर अवलंबून असते





