Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : ‘त्या’ हॉटेलमध्ये नेमके काय घडले? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा

बीड : बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत. या घटनेच्या आठ दिवसांनंतर आता दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचे असल्याचं सांगण्यात येत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
पहिला व्हिडीओ जो व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि निलंबनाची कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीचा आहे, ते केजमधील एका हॉटेलमध्ये भेटल्याचं दिसत आहे. तर दुसरा व्हिडिओमध्ये आरोपी सुदर्शन घुले, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्यासोबत ज्यांची हत्या झाली त्या संतोष पाटील यांचा भाऊ धनंजय देशमुख हे देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये धनंजय देशमुख हे त्या दोघांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर धनंजय देशमुखांनी मोठा खुलासा केला.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
मी आगोदरच हॉटेलमध्ये बसलो होतो. त्यांनी मला वेटरद्वारे इशारा केला आणि मला त्यांच्या टेबलवर बोलावून घेतले. सहा तारखेला जे भांडण झालं होतं, त्याबाबत ते विचार होते. पीएसआय राजेश पाटील यांच्याकडे या मारहाणीसंदर्भातील तपास होता. आमच्या गावचं मिटलं आहे असं मी त्यांना यावेळी सांगितलं. माझ्या भावाचा खून होणार असल्याची भनक मला लागली असती तर मी त्यांना भेटलोच नसतो.
आम्ही त्या हॉटेलमध्ये चहा घेतला. चहाचं बिल देखील मी दिले. त्यावेळी हाच आपला घात करणार आहे हे मला माहीत देखील नव्हते. या प्रकरणात राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी धनंजय देशमुख यांनी केली. या हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर 4 जण अजून फरार आहेत.





