नवी दिल्ली : दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच प्रमुख आरोपींना आज न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने या पाचही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १३ दिवसांची वाढ केली असून, त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान तुर्कमान गेट येथील फैज-ए-इलाही मशिदीच्या परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या एमसीडी (MCD) आणि पोलिसांच्या पथकावर जमावाने दगडफेक केली होती. या दगडफेकीत ऑफिसरसह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मशिदीचे पाडकाम केले जात असल्याच्या चुकीच्या दाव्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केले की, ३६,००० स्क्वेअर फूट जमिनीवरील बेकायदेशीर व्यावसायिक बांधकामे पाडण्यात आली, परंतु मशिदीला कोणताही धक्का लावण्यात आला नाही. तपासात मोठे खुलासे पोलिसांनी आतापर्यंत एकूण ११ जणांना ताब्यात घेतले असून यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. अफान, आदिल, शाहनवाज, हमजा, अथर आणि उबेद अशी नव्याने अटक केलेल्यांची नावे असून ते सर्व तुर्कमान गेट परिसरातील रहिवासी आहेत. डीसीपी निधिन वलसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीबद्दल अफवा पसरवण्यासाठी व्हॉट्सॲप ऑडिओ मेसेजचा वापर करण्यात आला. सुमारे ४ ते ५ व्हॉट्सॲप ग्रुप पोलिसांच्या रडारवर होते. ही घटना पूर्वनियोजित होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्या १० सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये जामिया परिसरातील एका महिलेचाही समावेश असून तिला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनेपूर्वी आणि नंतरही १२० हून अधिक मौलवी आणि स्थानिक अमन कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला होता. मशिदीला कोणतीही इजा केली जाणार नाही, हे वारंवार स्पष्ट करूनही अफवांच्या आधारे १५० ते २०० लोकांच्या जमावाने हिंसाचार केला. सध्या परिसरात शांतता असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने इतर आरोपींचा शोध घेत आहेत.