नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावर विशेष चर्चा झाली. या चर्चेत सहभाग घेताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी ‘वंदे मातरम्’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा महापुरुषांचा अपमान असल्याचे म्हंटले. काँग्रेसनेच या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केले, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेची सुरुवात केल्यानंतर प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर निशाणा साधला. प्रियांका गांधींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे: १. प्रियांका गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले की, हे गीत गेल्या १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा अविभाज्य भाग आहे. ‘वंदे मातरम्’ देशाच्या कणा-कणात जिवंत आहे. २. त्यांनी ‘वंदे मातरम्’वर आज चर्चा का होत आहे, याचे दोन मुख्य कारणे दिली. पहिले म्हणजे, बंगाल निवडणूक येत असल्याने पंतप्रधान मोदी आपली भूमिका बजावू इच्छितात, आणि दुसरे म्हणजे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांवर आरोप करणे. सरकार लोकांना विभागू पाहत आहे. ३. या गीताचा उच्चार केल्यावर आपल्याला स्वातंत्र्य संग्रामाच्या संपूर्ण इतिहासाची आठवण होते, असे त्या म्हणाल्या. ‘वंदे मातरम्’मुळेच ब्रिटिश साम्राज्य झुकले. ४. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या चर्चेची काय गरज आहे? हे आपले राष्ट्रगीत आहे, यावर काय वादविवाद होऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ५. हे सरकार भूतकाळातच रममाण राहू इच्छिते आणि वर्तमान व भविष्याकडे पाहत नाही. देशवासी विविध समस्यांनी ग्रासले आहेत, पण सरकार त्या सोडवत नाही. ६. ‘वंदे मातरम्’च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उल्लेख केला होता की, १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायले, पण हे अधिवेशन काँग्रेसचे होते, याचा उल्लेख त्यांनी केला नाही. ७. १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायले आणि १९०५ मध्ये ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात ते हे गीत गात रस्त्यावर उतरले. हे गीत मातृभूमीसाठी मर मिटण्याची भावना जागृत करते. ८. संविधान सभेने स्वीकारलेल्या ‘वंदे मातरम्’च्या या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हा त्या महान विभूतींचा अपमान आहे. ९. प्रियांका गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा अपमान करण्याबद्दल कठोर टीका केली. त्या म्हणाल्या, मोदीजी जेवढे दिवस पंतप्रधान राहिले, जवळपास तेवढेच दिवस नेहरू देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात होते. त्यांनी १२ वर्षे तुरुंगात काढली आणि १७ वर्षे पंतप्रधानपद भूषवले. १०. पंडित नेहरूंचा अपमान करण्यासाठी तुमच्या मनात जेवढ्या गोष्टी आहेत, त्या सर्व एकत्र करा आणि अध्यक्षांच्या परवानगीने त्यावर चर्चा करा, पण लोकांनी आपल्याला ज्या कामासाठी येथे पाठवले आहे, त्या बेरोजगारी, गरिबी आणि प्रदूषणावर लक्ष द्या, असे आवाहन त्यांनी केले. हेही वाचा – ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे: पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा हल्ला, म्हणाले – ‘त्यामुळेच फाळणीला…’