उमर खालिदसाठी न्यूयॉर्कच्या महापौराचे प्रेम; भाजप आक्रमक, म्हटले – ‘भारताचा अपमान खपवून घेणार नाही’

नवी दिल्ली: फेब्रुवारी २०२० च्या दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद याला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी पाठवलेल्या एका पत्रावरून भारतात नवा राजकीय वाद उफाळला आहे. या पत्राद्वारे ममदानी यांनी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीव्र संताप व्यक्त केला आहे. “भारत अशा प्रकारचे कोणतेही प्रयत्न खपवून घेणार नाही,” असा कडक इशारा भाजपने दिला आहे.
पत्रात नक्की काय आहे?
उमर खालिदची सहकारी बनोज्योत्सना लाहिरी हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर ममदानी यांचे एक हस्तलिखित पत्र शेअर केले आहे. या पत्रात ममदानी यांनी लिहिले आहे की, “प्रिय उमर, कडूपणा स्वतःवर हावी होऊ न देण्याबाबतचे तुझे शब्द मला वारंवार आठवतात. तुझ्या आई-वडिलांना भेटून आनंद झाला. आम्ही सर्वजण तुझ्याबद्दल चिंतेत आहोत.” या पत्रावर ममदानी यांची स्वाक्षरी देखील आहे.
भाजपकडून ‘हस्तक्षेपा’चा आरोप
ममदानी यांच्या या कृतीवर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत न्यूयॉर्कच्या लोकप्रतिनिधीच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाटिया म्हणाले, “भारताची न्यायपालिका स्वतंत्र असून जनतेचा त्यावर पूर्ण विश्वास आहे. जो व्यक्ती भारताचे तुकडे करण्याचे स्वप्न पाहतो, अशा आरोपीच्या समर्थनार्थ बाहेरचा व्यक्ती भाष्य करणं अयोग्य आहे. जर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले, तर १४० कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकजुटीने उभे राहतील.”
प्रकरण नेमके काय?
उमर खालिद याच्यावर २०२० च्या दिल्ली दंगलीचा ‘मुख्य सूत्रधार’ असल्याचा आरोप आहे. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. खालिदवर ‘यूएपीए’ (UAPA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून तो सध्या तुरुंगात आहे. या कायद्यांतर्गत जामीन मिळणे अत्यंत कठीण असते.
ममदानी यांच्या पत्राला भारताच्या अंतर्गत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप मानले जात असून, यामुळे भारत आणि अमेरिकेतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.





