Winter Lip Care Tips: थंडीमध्ये ओठ फाटू नयेत म्हणून काय कराल? जाणून घ्या लिप केअरच्या ६ सोप्या टिप्स
Winter Lip Care Tips ओठांची त्वचा शरीराच्या इतर भागांवरील त्वचेपेक्षा नाजूक असते. त्यामुळे बदलत्या हवामानाचा परिणाम ओठांवर लवकर होतो. हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रता कमी होते. थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या संपर्कामुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

Winter Lip Care Tips: हिवाळा सुरू झाला की थंडी आणि कोरड्या हवेमुळे त्वचेबरोबरच ओठांनाही त्रास होऊ लागतो. ओठ कोरडे पडणे, त्यांना भेगा जाणे, त्वचेची पापुद्रे निघणे किंवा जळजळ होणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. अशावेळी ओठांवर वारंवार जीभ फिरवणे किंवा सुकलेली त्वचा हाताने काढणे या सवयी त्रास आणखी वाढवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात ओठांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही. काही सोप्या गोष्टींची नियमित काळजी घेतल्यास ओठांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.
हिवाळ्यात ओठ का फाटतात?
ओठांची त्वचा शरीराच्या इतर भागांवरील त्वचेपेक्षा नाजूक असते. त्यामुळे बदलत्या हवामानाचा परिणाम ओठांवर लवकर होतो. हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रता कमी होते. थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या संपर्कामुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.
ओठ फाटण्यामागे काही सामान्य कारणे आहेत.
- थंड आणि कोरड्या हवेमध्ये जास्त वेळ राहणे.
- शरीरात पाण्याची कमतरता असणे.
- ओठ कोरडे झाल्यावर वारंवार जीभ फिरवणे.
- सुगंध किंवा इतर घटकांमुळे जळजळ होणारे लिप प्रोडक्ट वापरणे.
- ओठांची नियमित काळजी न घेणे.
- थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे.
हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Lip Care
१. नियमित लिप बाम लावा
हिवाळ्यात ओठांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी लिप बामचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. पेट्रोलियम जेली, शिया बटर किंवा सेरामाइड असलेला लिप बाम निवडू शकता. घराबाहेर पडण्यापूर्वी आणि रात्री झोपण्याआधी लिप बाम लावण्याची सवय ठेवा. ओठ कोरडे जाणवल्यास दिवसभरात पुन्हा लिप बाम लावा.
२. पुरेसे पाणी प्या
थंडीच्या दिवसांत अनेकांना तहान कमी लागते. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाणही कमी होते. शरीराला पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. दिवसभर नियमितपणे पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास त्वचेच्या आरोग्यालाही मदत होते.
३. ओठांवर वारंवार जीभ फिरवू नका
ओठ कोरडे पडले की अनेकजण ते ओले करण्यासाठी त्यावर जीभ फिरवतात. मात्र, लाळेतील घटकांमुळे ओठांचा कोरडेपणा आणखी वाढू शकतो. त्यामुळे ही सवय टाळा. ओठ कोरडे वाटल्यास त्यावर लिप बाम लावणे हा अधिक चांगला पर्याय आहे.
४. रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम लावा
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्चरायझिंग लिप बामचा थोडा जाड थर लावा. यामुळे ओठांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेषतः ओठ जास्त कोरडे पडत असतील तर ही सवय उपयोगी ठरू शकते.
५. SPF असलेला लिप बाम वापरा
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरी अतिनील किरणांचा परिणाम ओठांवर होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर जाताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त SPF असलेला लिप बाम वापरणे योग्य ठरते. उन्हात जास्त वेळ राहिल्यास गरजेनुसार पुन्हा लावा.
६. ओठांवरील पापुद्रे काढू नका
ओठांवर कोरडी त्वचा किंवा पापुद्रे तयार झाल्यास ते हाताने किंवा दातांनी काढण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने ओठांना जखम होऊ शकते आणि जळजळ वाढू शकते. त्याऐवजी ओठांना मॉइश्चराइज ठेवा आणि नैसर्गिकरीत्या बरे होण्यासाठी वेळ द्या.
ओठ फाटल्यावर कोणत्या चुका टाळाव्यात?
ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी काही सवयी टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ओठांची पापुद्रे दातांनी ओढू नका. वारंवार ओठ चाटणे टाळा. कोरड्या ओठांवर लिंबाचा रस किंवा जळजळ निर्माण करणारे घरगुती उपाय वापरू नका. तसेच ओठांवर वारंवार स्क्रब करू नका. यामुळे नाजूक त्वचेला त्रास होऊ शकतो.
सकाळपासून रात्रीपर्यंत असा ठेवा लिप केअर रूटीन
- सकाळी: उठल्यानंतर ओठांवर मॉइश्चरायझिंग लिप बाम लावा.
- घरातून बाहेर पडताना: SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला लिप बाम वापरा.
- दिवसभर: ओठ कोरडे जाणवल्यास किंवा खाण्या-पिण्यानंतर पुन्हा लिप बाम लावा.
- रात्री: झोपण्यापूर्वी ओठांवर पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्चरायझिंग लिप बामचा थर लावा.
हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी नियमितता महत्त्वाची आहे. योग्य लिप बाम, पुरेसे पाणी आणि काही चुकीच्या सवयी टाळल्यास ओठांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, ओठांना सतत भेगा पडत असतील, वेदना किंवा जळजळ होत असेल अथवा त्रास कमी होत नसेल, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

