प्रभात वृत्तसेवा जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेनिमित्त गडकोट पायथ्याशी असलेल्या “बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरला असून यंदाच्या बाजारात गावरान, राजस्थानी, काठेवाडी या जातीची किमान ६०० गाढवे दाखल झाली आहेत. किमान तीन दिवस येथे गाढवांची खरेदी-विक्री चालते. तुलनेत यंदा व्यापारी जास्त आणि गाढवे कमी अशी स्थिती असल्याचे पांडुरंग काळू पवार (अकलूज) यांनी सांगितले. पौष पौर्णिमा हा उत्सव खंडेराया – म्हाळसादेवींचा विवाह सोहळ्याचा दिवस मानला जातो. शेकडो वर्षांपासून येथे पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढवांचा बाजार भरतो. वैदू, वडार- बेलदार, मदारी, गारुडी आदी भटके विमुक्त समाज बांधवांसह गावगाड्यातील कुंभार, परीट बलुतेदारीतील बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यात्रेत मोठ्या प्रमाणावर गाढवांची खरेदी विक्री होते. म्हणूनच यात्रेला “गाढवी पूणव “असेही नाव प्रचलित झाले आहे. वर्षातून एकदा भरणाऱ्या या बाजारासाठी प्रशासन व नगरपालिकेच्या वतीने बंगाली पटांगण ही जागा राखीव ठेवली आहे.यंदाच्या बाजारात सातारा, सांगली, बारामती, कोल्हापूर, निपाणी, बीड, राजस्थान, गुजरात, काठेवाड येथून खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारी तर फार कमी प्रमाणात गाढवे दाखल झाल्याने काठेवाडी गाढवाला ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत किंमत मिळाली. गावरान जातीच्या गाढवाला ३० ते ४० हजार रुपये, मादीला ४०ते ५० हजार रुपयांपर्यंत किंमत मिळाल्याचे दस्तगीर गुलाब मदारी (रा. शिरूर) यांनी सांगितले. यंदाच्या बाजारात सुरेश गणपत पवार (रा. बारामती) यांच्या काठेवाडी मादी गाढवाला १ लाख ३० हजार रुपये सर्वात उच्चांकी भाव मिळाला सांगलीच्या दादा माने यांनी वर्षभराच्या उधारीवर दोन गाढवे घेतली. यांत्रिकी युगातही लाखांचा भाव सध्या आधुनिक यंत्र युगाचा काळ असला तरी डोंगर दऱ्यामध्ये जेथे यांत्रिक वाहने पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी बांधकाम साहित्य किंवा जीवनावश्यक वस्तूंचे ओझे वाहतुकीसाठी गाढवांचा वापर आजही केला जातो. बाजारात जातीवरून तसेच दातांवरून गाढवांची प्रतवारी ठरते. दुवान -तिवान चौवान, कोरा, असे जातीवरून संबोधले जाते. राजस्थानी काठेवाडी गाढवांना सर्वात मोठी किंमत मिळते. पूर्वीच्या काळी तीन दिवसांच्या भरणाऱ्या यात्रेत भटक्या विमुक्त समाजातील बांधवांची जातपंचायत भरत असे. यामध्ये देण्या घेण्याचे व्यवहार, लग्न मोडणे, जमवणे, तंटे बखेडे मिटवले जात होते. कुस्त्यांचा आखाडा भरवला जात होता. अर्थात ही जागा खंडेरायाच्या गडकोट पायथ्याला असल्याने कुलदैवताला साक्षी ठेवून हे सर्व चालत होता. मात्र, काळ बदलत गेल्यानंतर कालौघात सर्व संपले आहे. आता फक्त गाढवांचा बाजार भरत आहे.