पुणे जिल्हा | पुरंदरमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकर्यांचा नांगरणी पासून पेरणी पर्यंतचा सर्व खर्च हा वयाला गेला आहे.
त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन आठ दिवसांमध्ये सर्व पंचनामे करावेत तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे तहसीलदार विक्रम रजपूत यांना पुरंदर तालुका भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, अध्यक्ष निलेश जगताप, अॅड. श्रीकांत ताम्हाणे, मयूर जगताप,
अजिंक्य टेकवडे, पांडुरंग देवकर, महादेव शेंडकर, गणेश मेमाणे, दिलीप कटके, संदीप कटके, अनिल भोगळे, समीर भिसे, अरुण न्हालवे, मंगल पवार, मैनाताई जाधव, राजेंद्र कोलते, हरिचंद्र भापकर, दशरथ उबाळे, शिवाजी बारसुडे, सोमनाथ राणे, श्रीकांत राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक टेकवडे म्हणाले की, शेतकरी हा संपूर्ण आर्थिक मेटाकोटीला आला असून संपूर्ण नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून सरसकट मदत केली पाहिजे. शेतकर्याच्या शेतीचे संपूर्ण गणित कोलमडले असून शेतकर्यांना शासनाने मदत केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले आहे.ज्या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी मी स्वतः पहाणी करीत आहे.तसेच टेकवडी येथे मी स्वतः पहाणी केली आहे.शेतकर्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. – विक्रम राजपूत, तहसीलदार, पुरंदर





