#CWC19 : वेस्ट इंडिजची विजयी सांगता

अफगाणिस्तानने दिली शेवटपर्यंत झुंज

लीड्‌स – जिद्दीने खेळणाऱ्या अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला कौतुकास्पद झुंज दिली. तथापि हा सामना 23 धावांनी जिंकून विंडीजने शेवट गोड केला. विजयासाठी 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 50 षटकांत 288 धावांत आटोपला. वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 बाद 311 धावा केल्या होत्या.

अफगाणिस्तानच्या पहिल्या फळीतील फलदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. रहमत शाह व इक्रम अलिखिल यांनी 133 ची भागीदारी केली. त्यावेळी त्यांना विजयाच्या आशा होत्या. शाहने 10 चौकारांसह 62 धावा केल्या. पाठोपाठ इक्रमने नजीब उल्ला झाद्रान (31) याच्या साथीत 51 धावांची भर घातली. ही जोडी खेळत असतानाही त्यांना विजयाची संधी होती. ही जोडी फुटली व तेथूनच बिंडीजने सामन्यावर पकड घेतली. अलिखिल याने 8 चौकारांसह 86 धावा केल्या. नजीब 31 धावांवर बाद झाल्यानंतर खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत असगर अफगाण याने एकाकी झुंज दिली. त्याने 40 धावा करताना 4 चौकाराबरोबरच एक षटकारही मारला. त्यांना पराभव दिसत असतानाही सईद शिरजादने 25 धावा करताना 2 चौकार व 2 षटकार मारत चाहत्यांना खूष केले.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. एल्विन लुईस (58), शाय होप (77) व निकोलस पूरन (58) यांनी शैलीदार खेळ करीत चाहत्यांना चौकार व षटकारांचा आनंद मिळवून दिला. शिमोरन हेटमेयर (39) व जेसन होल्डर (45) यांनीही तडाकेबाज खेळ करीत अपेक्षांची पूर्तता केली.

संक्षिप्त धावफलक –

वेस्ट इंडिज 50 षटकांत 6 बाद 311 : (एल्विन लुईस 58, शाय होप 77,निकोलस पूरन 58, जेसन होल्डर 45, शिमोरन हेटमेयर 39, दौलत झारदान 2-73)

अफगाणिस्तान 50 षटकांत सर्वबाद 288 : (रहमत शाह 62, इक्रम अलिखिल 86, नजीब उल्ला झाद्रान 31, असगर अफगाण 40, सईद शिरजाद 25 कार्लोस ब्रेथवेट 4-63 , केमार रोच 3-37)

Leave A Reply

Your email address will not be published.