ढाका : बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाकातील शेर-ए-बांग्ला राष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवला जात असून, यात कॅरिबियन संघाने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अपूर्व पराक्रम गाठला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आणि वेस्ट इंडिजने गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. मात्र, पाहुण्या संघाने संपूर्ण ५० षटके केवळ फिरकी गोलंदाजांच्या मदतीने टाकून बांगलादेशला २१३ धावांपर्यंत रोखले. हा वनडे क्रिकेटमधील पहिला असा प्रकार आहे, ज्यामुळे वेस्ट इंडिजने जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. या सामन्यातील वेस्ट इंडिजचा डाव अद्याप सुरू असून, त्यांना विजयासाठी २१४ धावांचे आव्हान आहे. बांगलादेशचा डाव बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीला सैफ हसनला फक्त ६ धावांवर गमावले. त्यानंतर सौम्य सरकारने धीरगंभीर फलंदाजी करत ८९ चेंडूंमध्ये ३ चौकर आणि १ षटकारासह ४५ धावांची खेळी साकारली. कर्णधार मेहदी हसन मिराजने २१ धावा, तर नुरुल हसनने २३ धावा योगदान दिले. मात्र, सामन्याला खरी झळाळी आणली ती रिशाद हुसैनने. ४६व्या षटकात १६३/७ अशा कठीण परिस्थितीत मिराजसोबत ५० धावांची भागीदारी करत रिशादने केवळ १४ चेंडूंत ३९ धावांची विस्फोटक फटकेबाजी केली. त्याच्या २८०.७१ च्या स्ट्राईक रेटने संघाला २०० ओलांडण्यास मदत झाली. शेवटी बांगलादेश ५० षटकांत ७ विकेट्स गमावत २१३ धावांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे वेस्ट इंडिजला विजयासाठी २१४ धावांचे मध्यम आव्हान मिळाले. West Indies became the first team to go all spin over the course of 50 overs in men’s ODI 🤯 More from the game 👉 https://t.co/sEn9EhicM1 pic.twitter.com/Jzcrnksmvo — ICC (@ICC) October 21, 2025 वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक फिरकी धडाका पहिल्या वनडे सामन्यात ७४ धावांनी पराभव पत्करल्यानंतर वेस्ट इंडिजने ढाक्याच्या फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा पूर्ण फायदा घेतला. कर्णधार शाई होपने धाडसी निर्णय घेतला आणि संपूर्ण डावात एकही वेगवान गोलंदाजाला चेंडू दिला नाही. त्याऐवजी पाच फिरकी गोलंदाजांना प्रत्येकी १० षटकांचा स्पेल दिला: अकील हुसेन (१०-०-४१-२), रोस्टन चेस (१०-०-४०-०), खारी पियरे (१०-०-४२-०), गुडाकेश मोती (१०-०-६५-३) आणि अॅलिक अथानाझे (१०-३-१४-२). यापूर्वी श्रीलंकेने २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४४ षटके फिरकी टाकण्याचा विक्रम नोंदवला होता, पण वेस्ट इंडिजने हा विक्रम मोडून जगभरातील क्रिकेटप्रेमींना स्तब्ध केले. मोतीने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या, तर हुसेन आणि अथानाझे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. अथानाझेचा १० षटकांत ३ मेडन आणि फक्त १४ धावा देणारा स्पेल विशेष उल्लेखनीय ठरला. मालिका जिंकण्यासाठी विजय आवश्यक १८ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ७४ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर वेस्ट इंडिजसाठी हा दुसरा सामना महत्त्वाचा असणार आहे. मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पाहुण्या संघाला विजय आवश्यक आहे.