West Bengal | Acid attacks – नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनआरबीसी) च्या ताज्या वार्षिक अहवालात देशभरात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये थोडीशी घट दिसून आली. परंतु पश्चिम बंगाल अजूनही सर्वाधिक अॅसिड हल्ल्याचे प्रकरण असलेले राज्य आहे. ‘क्राइम इन इंडिया २०२३’ अहवालानुसार, त्या वर्षी देशभरात २०७ अॅसिड हल्ल्याचे प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यापैकी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६अ अंतर्गत ५७ प्रकरणे एकट्या पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आली. देशातील एकूण अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणांपैकी २७.५% प्रकरणे एकट्या बंगालमध्ये घडली. त्यामध्ये ६० जणींचा जीव गेला आहे. उत्तर प्रदेश ३१ प्रकरणांत ३१ बळी दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील गुन्ह्यांचे ३४,६९१ गुन्हे नोंदवले गेले. हे प्रमाण २०२२ मध्ये घडलेल्या ३४,७३८ प्रकरणांपेक्षा थोडे कमी आहे. राज्यात गुन्हेगारीचा दर प्रति लाख महिला लोकसंख्येमागे ७१.३% होता. २०२३ मध्ये राज्यात अंदाजे महिलांची लोकसंख्या ४.८६ कोटी होती. कलम ४९८अ (पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून क्रूरता) अंतर्गत सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले. पश्चिम बंगालमध्ये आयपीसीच्या कलम ४९८अ अंतर्गत १९६९८ गुन्हे नोंदवले गेले. ही आकडेवारीही उत्तर प्रदेशनंतर देशात दुसऱ्या क्रमांकाची आहे. उत्तर प्रदेशात १९,८८९ गुन्हे नोंदवले गेले. आयपीसीच्या कलम ४९८अ अंतर्गत पीडितांच्या बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये २०४६२ पीडितांची नोंद झाली, जी देशातील सर्वाधिक आहे. अॅसिड विक्रीवर बंदीची मागणी अॅसिड हल्ल्यातील पीडित आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परवान्याशिवाय अॅसिड विक्रीवर कडक बंदी घालण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (डब्ल्यू.पी. क्रिमिनल १२९/२००६, लक्ष्मी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) आपल्या आदेशात, काउंटरवर अॅसिड विक्रीवर बंदी घातली आहे आणि दुकानदारांनी खरेदीदाराची ओळख आणि खरेदी केलेल्या प्रमाणासह विक्रीचे संपूर्ण रजिस्टर राखले पाहिजे असे नमूद केले आहे.