कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याने पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत सहा पोलीस जखमी झाले असून पोलिस वाहनाचेही नुकसान झाले आहे. नजात पोलीस ठाण्याचे पथक शुक्रवारी रात्री संदेशखाली ब्लॉकमधील बोयरमारी गावात टीएमसी कार्यकर्ता मुसा मोल्ला याला अटक करण्यासाठी गेले होते. मत्स्यपालनासाठी वापरल्या जाणाऱ्या परिसरातील जलसाठ्यांवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. मोल्लाला घरातून ताब्यात घेऊन पोलीस वाहनात नेत असताना, गावकऱ्यांच्या एका गटाने अचानक दगडफेक सुरू करत पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून जमाव पांगवला, त्यानंतर मोल्लाला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, जमावाला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली ग्रामपंचायत प्रमुखासह दोन स्थानिक टीएमसी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने संदेशखालीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोप-प्रत्यारोप भाजप नेते सजल घोष यांनी या घटनेवर तीव्र टीका करत, पोलिसांवरील हल्ला हा ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील टीएमसी कार्यकर्त्यांची निराशा आणि निर्लज्जपणा आधोरेखित होत असल्याचा आरोप केला. याउलट, टीएमसीचे प्रवक्ते अरूप चक्रवर्ती यांनी पोलिसांवरील हल्ला निंदनीय असल्याचे सांगत, पक्ष अशा कृत्यांना पाठिंबा देत नसल्याचे स्पष्ट केले. सलग हिंसक घटनांमुळे संदेशखाली पुन्हा एकदा संवेदनशील ठरत असल्याचे चित्र आहे.