पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांचा ममतांवर बहिष्कार

कोलकता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा जाहीर केला. ममतांसमवेत कुठल्याही सार्वजनिक व्यासपीठावर उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. कोलकता बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून बंगालमधील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या राज्यात निदर्शनांचे सत्र सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, बोस यांनी व्हिडीओ संदेश जारी करून ममतांवर सामाजिकदृष्ट्या बहिष्कार टाकणार असल्याचे नमूद केले.
माझी वचनबद्धता बंगालच्या जनतेशी आहे. न्यायासाठी निदर्शने करणाऱ्यांशी आणि पीडितेच्या पालकांशी मी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतो. राज्य सरकारला कर्तव्य पालनात अपयश आल्याचे माझे निरीक्षण आहे. घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल ममतांविरोधात मी सक्रियता दर्शवणारी पाऊले उचलेन. राज्यपाल म्हणून माझी भूमिका घटनात्मक जबाबदाऱ्यांचे पालन करणारे असेल, असे बोस यांनी म्हटले.
बंगालमधील सध्याच्या स्थितीवरून ममतांची कोंडी झाल्याचे मानले जाते. अशात राज्यपालांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावरील दबाव आणखी वाढणार आहे. कोलकत्यातील घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बंगालमधील सरकारी रूग्णालयांमधील सेवा प्रभावित झाली आहे.





