West Bengal Election | बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 80 टक्क्यांहून अधिक मतदान; ममतांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

कोलकता – पश्चिम बंगालमध्ये गुरूवारी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 80 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. त्या मतदानामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भवितव्यही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद झाले.
बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. त्यातील 30 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. काही ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांचे आणि मतदानावेळी गैरप्रकार घडल्याच्या आरोपांचे गालबोट मतदान प्रक्रियेला लागले.
ममता निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघातही दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. त्यांचा मुकाबला भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याशी आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही भरघोस मतदान झाले. दोन टप्प्यांत मिळून 60 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
अंतिम आकडेवारी हाती आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये तब्बल 8 टप्प्यांत मतदान होणार आहे. तेथील निकाल 2 मे यादिवशी जाहीर होईल.





