West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये राजकीय वारे वेगाने बदलत असून, भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. या ऐतिहासिक विजयानंतर राज्याची धुरा कोणाकडे जाणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुवेंदु अधिकारी यांचे नाव आघाडीवर असले, तरी त्यांना पक्षांतर्गत चार दिग्गज नेत्यांकडून मोठी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वीच ‘बंगाली’ चेहराच मुख्यमंत्री असेल, असे स्पष्ट संकेत दिले होते. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) ‘बाहेरचे लोक’ या प्रचाराला छेद देण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. (West Bengal CM) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील ५ प्रमुख दावेदार – १. सुवेंदु अधिकारी: ममता बॅनर्जींचे ‘जायंट किलर’ सुवेंदु अधिकारी सध्या या शर्यतीत सर्वात प्रबळ मानले जात आहेत. २०२० मध्ये टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणे हा ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का होता. नंदीग्राममध्ये प्रत्यक्ष ममता बॅनर्जींचा पराभव करून त्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात सरकारला जेरीस आणले. पूर्व मेदिनीपूरबाहेर संपूर्ण राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. २. शमिक भट्टाचार्य: भाजपचा ‘भद्रलोक’ चेहरा – संघाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून शमिक भट्टाचार्य ओळखले जातात. त्यांची प्रतिमा अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखी ‘मृदू’ आणि ‘सुसंस्कृत’ (भद्रलोक) नेत्याची आहे. २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते भाजपचे पहिले निर्वाचित आमदार ठरले होते. उच्चशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप त्यांच्या नावाचा विचार करू शकते. ३. स्वप्न दासगुप्ता: दिल्ली दरबारी वजन असणारे व्यक्तिमत्व – माजी पत्रकार स्वप्न दासगुप्ता हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे मानले जातात. बंगालमधील बुद्धीजीवी वर्गात त्यांचे विशेष स्थान आहे. मात्र, प्रशासकीय अनुभवाचा अभाव ही त्यांच्यासाठी कमकुवत बाजू ठरू शकते. तरीही, केंद्रीय हायकमांडचा पाठिंबा असल्याने त्यांचे नाव शर्यतीत कायम आहे. ४. दिलीप घोष: शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता – बंगालमध्ये भाजपला खऱ्या अर्थाने उभारी देण्याचे श्रेय दिलीप घोष यांना जाते. २०१६ मध्ये केवळ ३ आमदार असताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ खासदार निवडून आणण्याचा चमत्कार घडवला. कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले घोष पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, खड़गपूर सदरमधून त्यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे. ५. सुकांत मजूमदार: उत्तर बंगालचा बुलंद आवाज – केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार हे उत्तर बंगालमधील भाजपचा मोठा चेहरा आहेत. उत्तर बंगाल हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. जर पक्षाला आपल्या या मजबूत गडातून मुख्यमंत्री द्यायचा असेल, तर सुकांत मजूमदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. दरम्यान, बंगालमध्ये सत्तांतर झाल्यास भाजप अनुभवाला प्राधान्य देणार की एखाद्या नव्या सुसंस्कृत चेहऱ्याला संधी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या तरी सुवेंदु अधिकारी आणि दिलीप घोष यांच्यात चुरस असल्याचे दिसते. सध्याच्या (4 PM) कलानुसार भाजप 194 जागांवर आघाडीवर तर टीएमसी 89 जागांवर आघाडीवर आहे.