Mamata Banerjee: निवडणूक हरताच ममता बॅनर्जींना पहिला मोठा धक्का, सुरक्षेत कपात
Mamata Banerjee: या पराभवासोबतच ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून बंगालमध्ये आता भाजप युगाला सुरुवात झाली आहे.

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर आता प्रशासकीय स्तरावर मोठे बदल दिसून येत आहेत. तृणमूल काँग्रेसचा (TMC) पराभव आणि भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याने, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेरील अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सिद्धार्थ नाथ गुप्ता यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.
‘शांती निकेतन १८८’ परिसरातील निर्बंध शिथिल –
अभिषेक बॅनर्जी यांचे कालिघाट येथील निवासस्थान ‘शांती निकेतन १८८’ परिसरातील चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या भागात असलेले पोलीस पोस्ट, बॅरिकेड्स आणि कडक सुरक्षा घेरे आता हटवण्यात आले आहेत. पूर्वी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची कडक चौकशी केली जात असे आणि रस्ताही एका लेनपुरता मर्यादित होता. आता हे निर्बंध हटवण्यात आलेत.
‘येलो बुक’नुसारच सुरक्षा: DGP
सुरक्षा कपातीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना DGP सिद्धार्थ नाथ गुप्ता म्हणाले की, “ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना ‘झेड प्लस’ (Z+) श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ‘येलो बुक’मधील नियमांनुसार या श्रेणीसाठी आवश्यक असणारा फौजफाटा तैनात आहे. मात्र, नियमापेक्षा जास्त असलेली अतिरिक्त सुरक्षा आता काढून घेण्यात आली असून, त्या पोलिसांचा वापर राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केला जात आहे. सुरक्षेत तांत्रिकदृष्ट्या कोणतीही कपात केलेली नसून ती केवळ प्रोटोकॉलनुसार मर्यादित करण्यात आली आहे.”
बंगालच्या राजकारणात ‘नवे पर्व’ –
१९७२ नंतर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे (भाजप) सरकार स्थापन झाले आहे. या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत ३ जागांवरून थेट २०७ जागांपर्यंत मजल मारली, तर तृणमूल काँग्रेसला १३५ जागांचे नुकसान सोसावे लागले.
भवानीपूरचा निकाल लक्षवेधी-
राज्यातील सर्वात चर्चेची ठरलेली भवानीपूर विधानसभा जागा भाजपने काबीज केली आहे. येथे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला.
सुवेंदू अधिकारी (BJP): ७३,९१७ मते
ममता बॅनर्जी (TMC): ५८,८१२ मते
या पराभवासोबतच ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून बंगालमध्ये आता भाजप युगाला सुरुवात झाली आहे.





