Pune : छावा बघायला गेले अन् पोलिसांच्या ट्रपमध्ये अडकले; हडपसर भागातून सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अशी केली अटक!

पुणे: सध्या देशभरात छावा चित्रपटाची क्रेझ आहे. छावा चित्रपटाला रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसात छावा ५०० कोटींची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ठ होईल, असे चित्रपट विश्लेषक सांगत आहे.
या चित्रपटाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भरभरून कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. सर्वत्र छावाचीच क्रेझ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र छावा माहोल तयार झाला असून प्रेक्षकांची पाऊल थिएटर्सकडे अलगद वळताना दिसत आहेत.
मात्र, छावा चित्रपट पाहण्याचा उत्साह दोन आरोपींना महागात पडला आहे. दोघेही छावा पाहायला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. हा प्रकार फिल्मी स्टाईल वाटवा असाचा घडला आहे. यामुळे याची पुण्यात जोरदार चर्चा आहे. या दोन्ही आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली आहे. धर्मेनसिंग उर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी हडपसर भागातून सापळा सचून अटक केली आहे.
कशी केली अटक?
धर्मेनसिंग अर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड हे दोन्ही आरोपी हडपसर भागात असलेल्या थिएटरमध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. हे दोघेही दिघी येथील आदर्श नगरमधील शिव कॉलनीमध्ये राहतात. त्यांच्यावर यापूर्वी मकोका, तसेच एनडीपीएस कायद्याबरोबर शस्त्र कायद्याअन्वये दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी संबंधित ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पोलिसांनी ट्रप लावला आणि या दोघांना थेट चित्रपटगृहातूनच अटक केली. या अटकेची पुण्यात जोरदार चर्चा होत केली जात आहे.





