Sanjay Raut : दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असून कालपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी होणार असल्याचे दिसते. सध्या या अधिवेशनासाठी उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. आज १० मार्च त्यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशीवर सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. २८ जानेवारी २०२६ या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हा अपघात की घातपात यावर संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नुकतेच माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर पाहू असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानावर संजय राऊत यांनी ‘अहवाल आल्यावर पाहू हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात; पण, एक पत्नी नाही’, असे म्हणत सुनेत्रा पवार यांना सल्ला दिला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असून, त्या फडणवीसांच्या केबिनेटमध्ये आहेत. याबाबत त्यांनी अधिक जोर लावून मुख्यमंत्र्यांना सागावं, असे देखील राऊत म्हणाले. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? “तपासयंत्रणांचा अहवाल येऊदे मग पाहू हे एक उपमुख्यमंत्री बोलू शकतात. पण, एक पत्नी बोलू शकत नाही, जिनं अशा पद्धतीनं आपला पती गमावला आहे, मुलं ज्यांनी आपला बाप गमावला ते असं बोलू शकत नाहीत. हे माझं वैयक्तिक मत आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामध्ये काही संशय असेल तर पवार कुटुंबातील दोन्ही पक्षांनी, रोहित पवारांनी समोर आणलेलं संशोधन योग्य असेल तर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केला पाहिजे.” राऊतांचे संतप्त सवाल अपघात प्रकरणाची विविध स्तरावर चौकशी सुरु आहे. या चौकशीवर संजय राऊत यांनी सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो? असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे. फडणवीस नेहमी म्हणतात माझा जीवाभावाचा मित्र गेला वगैरे, मग लपवता का? व्ही. के. सिंग भाजपचा सदस्य आहे का? त्यानं तुम्हाला निवडणुका लढवण्यासाठी पैसे दिले आहेत का? काय ते एकदा सांगा. असे संतप्त सवाल संजय राऊत यांनी केले आहेत. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी हा विषय गांभीर्यानं पुढे नेला पाहिले, असेही राऊत म्हणाले. हेही वाचा : Dental Health: दातांमध्ये कीड वाढतेय? वेळेत काळजी घेतली तर रूट कॅनल टाळता येईल