श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत

आळंदी – दीर्घ सुट्टीनंतर मोठ्या उत्साहाने संस्काराचे पाठ गिरविण्यासाठी 15 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ढोल पथकाच्या वाद्यात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, डॉ. दीपक पाटील, प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा शिवकन्या मोरे, सहसचिव उध्दव डिघोळे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यानिमित्ताने राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, विद्यालयाचे माजी विद्यार्थी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सदस्य व पुणे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी प्रशालेस सदिच्छा भेट दिली. संस्था अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप –
विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत या धोरणाला अनुसरून शासनाच्या वतीने इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये १००% उपस्थिती बद्दल इयत्ता १ ली ते ८ वी मधील ४३ विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व त्यांचे वर्गशिक्षक यांचा संस्थेच्या वतीने सन्मान चिह्न, स्कूल बॅग देऊन कौतुक करण्यात आले. वर्षभर १००% उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने दुर्वा माने या विद्यार्थिनीने व पालकांच्या वतीने रामेश्वर महाराज भोजने यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य आणले होते, लकी ड्रॉ च्या माध्यमातून ते साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. अजित वडगावकर, डॉ. दिपक पाटील यांनी नवांगत विद्यार्थ्यांचे स्वागत करून संस्कारमय पिढी घडविण्याच्या दृष्टीने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ सारख्या चालणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती देत मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच प्राचार्य दीपक मुंगसे यांनी नवांगताचे स्वागत करून शिस्त, स्वच्छता इ. गुणांचे, पालन करून शाळा सुव्यवस्थित चालावी त्यास अनुसरून प्रशालेचे नियम याविषयी विद्यार्थी व पालक यांना सूचना देण्यात दिल्या.
भाऊसाहेब कारेकर यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रशालेस सदिच्छा भेट देत नवांगत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पाहून आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संपत सूर्यवंशी यांनी संस्थेत विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे, संस्था पदाधिकाऱ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले. उपस्थितांचे आभार व्यक्त करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.





