गणरायाच्या स्वागतासाठी लगबग

उत्सव अवघ्या 12 दिवसांवर : सोमेश्‍वरनगरला तयारीला वेग

वाघळवाडी – गणपती बाप्पा मोरया… अशी आर्त हाक देत गणेशोत्सवाची वाट बघणाऱ्या भक्‍तांचा लाडक्‍या बाप्पाचा उत्सव अवघ्या 12 दिवसांवर आला आहे. गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भाविकही तयारीला लागले आहेत.

अगदी मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांपासून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि घरात चिमुकली मंडळी देखील तयारी लागली आहेत. मूर्तीकार शेवटचा हात फिरवण्यावर मग्न आहेत; तर मंडळाचे सभामंडप उभारणीच्या कामांना सध्या सोमेश्‍वरनगर परिसरात वेग आला आहे. तर बाजारपेठेत थर्माकॉलची आकर्षक मंदिरे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

बाजारपेठ आकर्षक गणेशमूर्ती व आरास सजावटीचे साहित्याने सजली आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे 12 दिवस उरल्याने मूर्ती स्टॉलवर मूर्ती बुकिंगसाठी गर्दी दिसत आहे. यावर्षी मल्हार, दगडूशेठ, सिंहासनारुढ, लालबागचा राजा अशा मूर्तींना अधिक मागणी आहे. तर मोठ्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम कुंभारवाड्यात अजूनही सुरू असून त्यासाठी कारागीर दिवस-रात्र झटत आहेत. सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून मंडप बांधणी, देखावा बनविण्यात गुंतले असल्याचे दिसून येत असून शहरात चौका-चौकात मोठ-मोठे मंडप उभे राहत आहेत.

लाडक्‍या गणरायाच्या स्थापनेसाठी सुंदर कलाकुसर आणि सुंदर आरास असावी, यासाठी थर्माकॉल मखरांना मागणी असते. यावर्षीही विविध प्रकारच्या व आकारातील मखरी बाजारपेठेत विक्रीस आल्या आहेत.

अंबारी, महालक्ष्मी मंदिर, तिरुपती मंदिर, चौरंग, मूषकवाहक रथ, सिंहासन यासारखे मखरांना मागणी आहे. तसेच पाण्याचा धबधबा, छोटी-छोटी कलात्मक झाडे, रंगबेरंगी फुले, प्लॅस्टिकचे फुलांचे हार, तोरण यासह विविध प्रकारच्या शोच्या वस्तूही मुबलक प्रमाणात विक्रीस आल्या असून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×