गैरप्रकारांना आळा घालण्यास ठोस भूमिका घेण्याची मागणी
वडूज – सातारा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदाची सूत्रे नव्यानेच हाती घेतलेल्या डॉ. तेजस्वी सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रक काढून पोलीसांनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांची कागदपत्रे तपासणीत वेळ न घालवता प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर द्यावा, असे फर्मान काढले आहे. या निर्णयाचे समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले आहे. याचबरोबर एस. पी. मॅडमनी पोलीसांच्या तोडपाणी सिस्टीमवरही चांगलाच वॉच ठेवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
रस्त्यावरुन दुचाकी प्रवास करणारे बहुतांशी सर्वसामान्य नागरीक असतात. सर्वसाधारण 50 कि.मी. च्या आतला प्रवास दुचाकीवरुन होत असतो. दैनंदिन कामाबरोबरच जवळच्या नातेवाईकांचे शुभकार्य अथवा दुर्घटनेच्या प्रसंगी एस. टी. बस व इतर खासगी वाहन वेळेत मिळेल याची खात्री नसल्याने दुचाकीचा वापर केला जातो. अशावेळी घाईगडबडीत गाडीची कागदपत्रे बरोबर घेतली असतीलच असे नाही.
दुचाकीवरुन प्रवास करणारे 95 टक्के नागरीक हे सरळमार्गी असतात. चोरीचे वाहन वापरणारे दोन ते पाच टक्केच असतात. त्यांची माहितीही स्थानिक पोलिसांना असतेच. असे असतानाही अनेकवेळा गावाबाहेर थांबणारे पोलीस कर्मचारी दुचाकीस्वारास अडवतात. त्याच्याकडे वेगवेगळे कागदपत्राची मागणी करत हैराण करुन सोडतात. एक कर्मचारी विचारपूस करत असताना दुसरा कर्मचारी नुसताच पावती पुस्तक इकडून तिकडे नाचवण्याचे काम करत असतो. अशावेळी गडबडून गेलेला वाहनस्वार नको ती झंजट असे म्हणत 500 वरुन 50 ते 100 रुपयांवर तोडपाणी करत असतो. अनेकवेळा पर्यटन स्थळ व अन्य प्रेक्षणीय स्थळाच्या ठिकाणी पोलीसांनी तरुण प्रेमिकांना गाठून त्यांच्याकडून चांगलीच वसूली केल्याचे प्रकारही घडतात. डॉ. सातपुते मॅडमच्या आदेशामुळे या सर्व गोष्टींना फाटा मिळणार आहे.
दुसऱ्या बाजूला किरकोळ अदखलपात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयितास पोलीस ठाण्यात सकाळी लवकर बोलावणे, दिवसभर बसवून ठेवणे, कलमे वाढवून लावण्याची भिती दाखविणे, वॉरंट नसताना संशयिताच्या घरी पोलीसगाडी घेवून जाणे अश्याप्रकारे प्रकार काही पोलीस ठाण्यात राजरोसपणे घडत असतात. तर चिरीमिरी दिल्यानंतर मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना सुलभ प्रक्रियेतून घेवून जाणे. त्याचबरोबर व्ही.आय.पी. ट्रिटमेंट देणे अश्या प्रकारची मांडवली केली जात असते. या कामासाठी काही पोलीस ठाण्यात तथाकथीत पोलीस मित्रही कार्यरत आहेत. तसेच वरिष्ठांची हुजरेगिरी करुन अनेक वर्षे एकाच पोलीस ठाण्यात तळ ठोकून राहणारे अनुभवी दादा ही माहिर आहेत. या सर्वांची भांडाफोड करण्यासाठी एस. पी. मॅडमनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या सी.सी.टी.व्ही. ची महिन्या पंधरा दिवसातून एखाद्यावेळी तपासणी करावी. त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. अधिकारी, कर्मचारी, फिर्यादी, संशयित आरोपी व्यतिरीक्त कोण कोण अभ्यंगत पोलीस ठाण्यात नियमित वावरत असतात. अधिकारी, पोलीसांचे कोअर व नेट बॅंकिंग कसे चालले आहे याचाही त्यांना चांगलाच उलगडा होईल.