– विजय शेंडगे माधव राजगुरू यांची वाटचाल शिक्षण क्षेत्रातली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारतीमध्ये त्यांनी विशेषाधिकारी म्हणूनही काम पाहिले. मशाल, जीवनशाळा, गुरुजींचा गहिवर यासह त्यांची 14 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे संस्थात्मक कामदेखील फार मोठे आहे; परंतु बालसाहित्य ही त्यांची खरी रुची. अत्यंत खडतर जीवनप्रवास असणाऱ्या माधव राजगुरूंना त्यांचे आत्मचरित्र लिहावे असे वाटणे स्वाभाविक आहे. ते त्यांनी लिहिले आणि “बिकट वाट परी’च्या रूपाने प्रकाशित होऊन वाचकांच्या समोर आले. आजची पिढी चांदीचा चमचा मुखी धरून जन्मली आहे. मुलांना कोणतेही सायास पडू नयेत यासाठी आईवडील जीवाचं रान करतात. परंतु 1980 च्या आधी जन्माला आलेल्या पिढीच्या नशिबी ते भाग्य नव्हते. शिस्त आणि कष्ट यात ती पिढी तावून सुलाखून निघाली. माधव राजगुरू देखील त्याला अपवाद नाहीत. त्यांचा जन्म तर 1956 चा. या आत्मचरित्राची मांडणी पाच पर्वात केली आहे. प्रसंगानुरूप मांडणीमुळे ते कंटाळवाणे होत नाही. त्याला नेमकेपणा प्राप्त झाला आहे. नाटकात भूमिका मिळणार या आशेने घरातले पैसे चोरून मुंबईला जाण्यासाठी निघालेले राजगुरू तिकिटासाठी पुरेसे पैसे जवळ नसल्यामुळे पुण्यात उतरले आणि पुढे काय घडलं? राजगुरू यांचं आयुष्य योग्य मार्गावर कसं आलं? हे सगळं जाणून घेण्यासाठी हे आत्मचरित्र वाचायलाच हवं. “बिकट वाट वहिवाट नसावी’ हा अनंत फंदी यांचा “फटका’ सर्वपरिचित आहे. त्यात ते “माणसाने धोपट मार्ग सोडू नये’ असं सांगतात. माधव राजगुरू देखील त्यांच्या मनोगतात “शिक्षण, नोकरी, घर, लग्नं, मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्ने’ असं चाकोरीबद्ध आयुष्य जगत राहिल्याचं कबूल करतात.थोडक्यात, त्यांनी धोपटमार्ग सोडला नाही. पण या धोपटवाटेवरची त्यांची वाटचाल देखील सुखावह नव्हती. शिवाय या धोपट मार्गावरून चालत राहिल्याने त्यांना अनेक ध्येय साध्य करता आली नाही. वयाच्या अगदी 20 व्या वर्षी लिहायला घेतलेली “पायदळी चुरगळणारे फूल’ ही कादंबरी कधीच प्रकाशित झाली नाही. आत्मचरित्र लिहिणं ही सर्वात कठीण गोष्ट असते.कारण आत्मचरित्रात परखड मांडणी अपेक्षित असते. परखड लिहिताना सहकारी, मित्र दुखावले जाण्याची शक्यता असते. आत्मचरित्र लिहिणाऱ्या अनेकांना त्यांची वाटचाल किती खडतर होती. त्यांनी किती कष्ट उपसले. आयुष्यात आलेल्या संकटांना कसे तोंड दिले हे सांगायचे असते. हे सांगताना नाही म्हटले तरी त्या लेखनाला आत्मगौरवाचा वारा लागतोच. पण “बिकट वाट परी’ वाचताना लेखकाने कुठेही स्वतःची पाठ थोपटून घेतलेली नाही. कोणाला दोष दिला नाही. आयुष्याचे संचित जसे आहे तसे मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, पाने : 184, मूल्य : 160 रुपये