देहूतील आठवडे बाजारात नियोजनाचा अभाव

रामकुमार आगरवाल
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथील आठवडे बाजारात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. वर्दळीच्या रस्त्यावरच विक्रीसाठी बसणारे पथारीवाले, फळे-भाजीपाला विक्रेते, रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या जाणाऱ्या हातगाड्या, टेम्पो, दुचाकी-चारचाकी यांची अवैध पार्किंग, अस्ताव्यस्त उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षा यामुळे तासन तास वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत असून याचा फटका ग्राहकांना आणि सामान्य नागरिकांना बसत आहे.
देहूगाव येथे मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस आठवडे बाजार भरत असतो. सकाळी नऊ ते सायंकाळी उशिरापर्यंत हा बाजार असतो. बाजारांमध्ये भाजीपाला, फळे, मसाला, कपडेवाले, स्टेशनरी साहित्य, भांडी अशी अनेक वस्तूंची शेकडो दुकाने असतात. तसेच पंचक्रोशीतील नागरिक खरेदीसाठी इथे येत असल्याने बाजारात येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते.
अशात डॉ आंबेडकर चौक ते मुख्यकमान हा वाहनांच्या वाहतुकीसाठीचा मुख्य वर्दळीचा रस्ता असून देखील येथेच भाजी विक्रेते व इतर साहित्य विक्रेते पथारीवाल्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमणे केली असून काहींनी थेट तंबू ठोकले आहे. त्यामुळे मुळात अरुंद असलेला हा रस्ता आणखीन अरुंद झाला आहे.
या मुख्य रस्त्यावरच पथारीवाले, हातगाडी विक्रेते उभे राहत असल्याने ग्राहकांना त्यांची वाहने रस्त्यावर पार्किंग करावी लागत आहेत. सायंकाळी ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर या परिस्थितीत गर्दी वाढून वाहतूक कोंडी होते. यामुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक वाहतूक कोंडीत अडकून पडतात.
वाहतूक नियंत्रण पोलीस, स्थानिक पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासन यांचे आठवडे बाजारातील या परिस्थितीकडे दूर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. आठवडे बाजार कोणत्या दिवशी असावा इथपासून ते कोणत्या विक्रेत्यांना दुकानांची मुभा द्यावी, जागेची मर्यादा, वाहतूक नियोजन, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, बेशिस्त विक्रेत्यांवर कारवाई असे अनेक प्रश्न याबाबत प्रलंबित असल्याचे सुज्ञ नागरिक सांगत आहेत.
पाकीटमार, मोबाईल चोर यांचा बंदोबस्त व्हावा
आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना इतरही अनेक समस्या तोंड वर काढत आहेत. यात बाजारात फिरणारे पाकीटमार, मोबाइल चोर, महिलांची छेड काढणारे गुंड यांचा बंदोबस्त करणे हेही तितकेच गरजेचे आहे. बाजारातील वातावरण निर्भय निर्मळ असावे अशी अपेक्षा ग्राहकांकडून होत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने भुरट्या चोरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.





