रांची : झारखंडमध्ये रविवारी लग्नसोहळ्यासाठी वऱ्हाडाला घेऊन येणारी बस उलटली. त्या भीषण अपघातात ७ जण मृत्युमुखी पडले. तर, सुमारे ८० जण जखमी झाले. मृतांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. छत्तीसगढमधील वऱ्हाड घेऊन बस झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात निघाली होती. त्या जिल्ह्यातील एका घाटात बस उलटली. ब्रेक फेल झाल्याने चालकाला प्रयत्न करूनही बस थांबवता आली नाही. त्यातून अपघात घडल्याचे सांगण्यात आले. अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक संख्येने प्रवासी बसले होते. बस उलटल्यानंतर ५ जणांचे जागीच निधन झाले. तर, उर्वरित दोघांचे रूग्णालयात उपचारावेळी निधन झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयांत दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असलेल्यांना रांचीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी जखमींना योग्य उपचार पुरवण्याची सूचना प्रशासनाला केली.