महाराष्ट्रात पुढील तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

पुणे – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. तापमानाचा पारा चढत असताना आता अवकाळी पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. काल रात्री मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाने उष्णतेला थोडा ब्रेक लागला. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाचा यलो अलर्ट: या भागांत राहा सावध
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि परभणी येथे वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: परभणी आणि हिंगोलीमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून, यलो अलर्ट लागू आहे.
पुढील ५ दिवस, विदर्भात काही ठिकाणी विजांसह गडगडाटी वादळे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट घ्या. pic.twitter.com/bhlKMP384S— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 19, 2025
गारपिटीचा ऑरेंज अलर्ट: विदर्भात धोक्याची घंटा
विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या भागांत ढगांच्या गडगडाटासह गारपीटीची शक्यता वर्तवली गेली असून, येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण, मुंबई आणि पुणे येथे वातावरण तुलनेने सामान्य राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
उष्णतेनंतर पावसाचा दिलासा, पण शेतीवर संकट
मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. हवामान खात्याने यापूर्वी तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णता आणि उकाडा वाढणे अपेक्षित असते, पण यंदा अवकाळी पावसाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
पुढील तीन दिवस ठरणार महत्त्वाचे –
हवामान खात्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तीन दिवसांत हवामानातील बदलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असून, पावसासोबतच वादळी वाऱ्याचा धोकाही कायम आहे. या काळात शेती आणि दैनंदिन व्यवहारांसाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून ताज्या अपडेट्स जाणून घेता येतील.





