Weather Updates: कोजागरीपर्यंत राज्यभरात पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई – राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुरुवारी विजेच्या कडकडटासह पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दिवसभर उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. परंतु, रात्री 09 वाजताच्या सुमारास आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तर आता आठवडाभर म्हणजे साधारणतः कोजागरीपर्यंत राज्यभरात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात गुरुवारी संध्याकाळी मुंबई उपगनरात दमदार पावसाने हजेरी लावली. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. येत्या आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या 15 तारखेनंतर राज्यातून मान्सूनच्या परतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तोपर्यंत आठवडाभर राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोजागरीपर्यंत तरी मान्सून राज्यातून एक्झिट घेणार नसल्याचेच कळते.
तर, या आठवड्याभरात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.





