Weather Update : राज्यावर तुफानी संकट ! पुढील काही तासांत मान्सून धडकणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्टचा अंदाज
राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

Weather Update : राज्यात उकाड्याने नागरिक त्रस्त असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, तर पालघर आणि ठाणे परिसरात उष्ण व दमट वातावरणासह दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
तसेच, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे.
अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे. विशेषतः वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मान्सूनची वाटचालही वेगाने सुरू आहे. सध्या मान्सूनने लक्षद्वीप, अरबी समुद्राचा काही भाग, कोमोरिन क्षेत्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापला आहे. पुढील टप्प्यात केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले असून, लवकरच मान्सून देशात अधिकृतपणे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.





