Weather Update: मान्सून आउट! राज्यात कोरडं कायम, दुष्काळाच्या सावटाने बळीराजा चिंतेत
Weather Update: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी कसे असणार वातावरण?

Weather Update: सध्या परतीच्या मान्सूनचा काळ असून हवामानात मोठे उलटफेर जाणवत आहेत. मान्सून परतीच्या वाटेवर असल्याने महाराष्ट्रातून पावसाचा जोर ओसरला आहे. 19 सप्टेंबरपासून राजस्थानातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर अखेर काही भागात पावसाने हजेरी लावली. आता 1 ऑक्टोबर रोजी वातावरणात काहीसा बदल जाणवण्याची शक्यता आहे.
यंदा एल-निनोच्या संकटामुळे या काळात पावसात मोठी तूट असून राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. देशात यावर्षी सरासरीपेक्षा 13 टक्के पाऊस कमी झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. महाराष्ट्रात देखील बहुतांश भागात पाऊसच झाला आहे.
दीड महिने राज्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला, पण तोही समाधानकारक नव्हता. त्यामुळे राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे. हवामान खात्याच्या दाव्यानुसार, एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी
मान्सून परतीच्या प्रवासाला लागल्याने मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सकाळच्या वेळी हवामान अंशत: ढगाळ राहील. तर दुपारनंतर भरपूर ऊन पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32-34 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. हवामानात उकाडा आणि दमटपणा जाणवेल. तर विदर्भात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
आज मुंबईसह कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला मोठ्या पावसाचा इशारा नाही. मात्र, बहुतांश भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही. तर नाशिकमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत आज पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र, पुणे ते सोलापूर सर्वच जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा :
Valet Parking: व्हॅलेट पार्किंगच्या आडून वरकमाईचा फंडा! महापालिकेची जागा मोफत वापरण्याचा प्रकार






