Mansoon Update: पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – राज्यात कोकणासह अनेक भागात मान्सून पूर्व पावसाने जोर धरला आहे. तसेच पुढील काही तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे, ही एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल –
मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये अरबी समुद्रात दाखल होईल –
मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातल्या ग्रामीण भागात जनजीवनावर काहीसा परिणाम झालेला दिसून येत आहे. विशेषतः बागायती शेतीला याचा फटका बसला आहे. अंदमानात दाखल झालेला मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये अरबी समुद्रात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तळकोकणात सर्वत्र मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभवाडीत मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. मान्सून पूर्व पावासामुळे शेतकऱ्यांची काम खोळबली आहेत.
उत्तर भारतात उष्णतेची लाट
उत्तर भारतासमवेत देशभरातील अनेक भागांत उष्णतेची लाट असल्याचे दिसून येत आहे. दिवसा घराबाहेर पडणही कठीण झाले आहे. हीटवेव असल्याकारणाने लोक अक्षरश: आजारी पडत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान समवेत सगळ्याच राज्यांमध्ये भीषण गर्मीचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे.





