– जगदीश काळे हवामान बदलाचे दुष्परिणाम हिमालयीन भागातही होत आहेत. या परिसरात पूर्वीच्या तुलनेत हिमवृष्टीचे प्रमाण कमी होत आहे. बहुतांश पर्वतांवरचा बर्फ कमी झाला आहे. तो केवळ टोकावरच दिसत आहे. ‘स्नो ड्रॉट’ची स्थिती नदी आणि शेतकर्यांसाठी चिंताजनक बाब ठरत आहे. गेल्या दोन दशकांपासून हिंदुकुश हिमालय क्षेत्रात दरवर्षी कमी बर्फ दिसून येत आहे. त्याचवेळी तापमान अधिक असल्याने पडणारा बर्फ देखील लवकर वितळत आहेत. हा एक हवामान बदलाचा दुष्परिणाम आहे. एकीकृत पर्वतीय विकास आंतरराष्ट्रीय केंद्र (आयसीआयएमओडी)च्या अहवालात गेल्या 23 वर्षांपासून बर्फ टिकून राहण्याचा कालावधी हा तब्बल 23.16 टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल, वाढते तापमान आणि पश्चिम वार्याचा कमकुवत प्रभाव यामुळे हिमालयाच्या बहुतांश भागात हिमवृष्टीचा अभाव दिसून येत आहे. ही स्थिती मातीतील आर्द्रता, पाण्याची उपलब्धता यासाठी चिंता निर्माण करणारी आहे. हिंदुकुश हिमालय क्षेत्राचे महत्त्व हिंदुकुश हिमालयचा भाग भारत, चीन, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार आणि बांगलादेशपर्यंत विस्तारला आहे. या ठिकाणी गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रासारख्या अकरा मोठ्या नद्या वाहत आहेत. वसंत ऋतूत बर्फ वितळल्यानेच या नद्यांना पाणी मिळते. तब्बल 17 टक्के लोकसंख्येच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी या नद्या महत्त्वाच्या ठरतात. शिवाय या पाण्याचा वापर सिंचन आणि हायड्रोपॉवरसाठी देखील केला जातो. शास्त्रीय अहवालात प्रकाशित अभ्यासानुसार हवामान बदलामुळे हिंदुकुश हिमालय भागातील तापमानात जागतिक सरासरीत 0.74 अंश सेल्सिअसची वाढ नोंदविली गेली आहे. त्याचवेळी 2003 ते 2020 या काळात हिमालयातील बहुतांश ठिकाणचा बर्फाच्छादित भागही कमी झाल्याचे निदर्शनास आले. पूर्वी इथे सरासरी 102 दिवस बर्फ दिसत होता आणि आता दर दहा वर्षांला पाच दिवस कमी होत आहेत. हा अभ्यास हेमंत सिंह, डॉ. दिव्येश वराडे आणि डॉ. विवेक गुप्ता यांच्या पथकाने केला आहे. कमी बर्फामुळे उत्पादनात घट तापमान वाढल्याने 2003 ते 2016 या काळात हिमालयातील स्नो लाइनवर गेली आहे. म्हणजे खालच्या भागात बर्फ पडण्याऐवजी तो केवळ अधिक थंडीच्या ठिकाणी आणि शिखरावरच पडत आहे. या कारणामुळे शेतीच्या क्षेत्रफळात बदल होत असून फळबागांवर त्याचा परिणाम होत आहे. क्लायमेंट ट्रेंडसच्या एका अहवालानुसार, उत्तराखंडमध्ये 2016-17 पासून 2022-23 या काळात सफरचंदाच्या शेतीचे क्षेत्रफळ सुमारे 25.201 हेक्टरवरून 11.327 हेक्टरवर आले आहे. त्याचवेळी सफरचंद आणि लिंबाचे उत्पादनही घटले. सफरचंदाच्या उत्पन्नात 30 टक्के तर लिंबाच्या उत्पादनात 58 टक्के घट पाहावयास मिळाली आहे. पंतप्रधान रिसर्च फेलो हेमंत सिंह हे आयआयटी जम्मूत बर्फ आणि ग्लेशियरवर अभ्यास करत आहेत. त्यांच्या मते, भारतात सफरचंद सप्टेंबर महिन्यात येतात. पण त्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हवा असणारा बर्फ दिसत नाही. बर्फ पडण्यास होणारा विलंब आणि पर्वतावरचे वाढते तापमान पाहता हंगाम लांबणीवर पडत आहे. सफरचंदाला पुरेशा प्रमाणात थंड हवा आणि मातीतून आर्द्रता मिळत नाही. साहजिकच फळाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. नवाब कयूम यांचे कुटुंबीय गेल्या पंधरा वर्षांपासून काश्मीरच्या गंदरबल येथे अक्रोडची शेती करतात. डिसेंबर महिन्यात त्याचे पीक घेतले जाते. मात्र, कमी बर्फ असल्याने त्यांना अक्रोडची झाडे तोडावी लागत आहेत. नवाब कयूम म्हणतात, आमच्या अक्रोडची झाडे खराब झाली आहेत. पूर्वी एका झाडातून आम्हाला 50 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न व्हायचे. परंतु आता बर्फ आणि पाऊस कमी असल्याने पिकांना पुरेशी थंडी मिळत नाही. साहजिकच दर्जेदार अक्रोडचे उत्पादन होत नाही. नवाब कयूमसारखे अनेक शेतकरी हिमालय भागात बर्फ कमी पडत असल्याने नुकसान सहन करत आहेत. पश्चिमेकडील वारे हिवाळ्यात उत्तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचे प्रमाण कमी राहण्याचे कारण म्हणजे पश्चिम वार्यात अडथळे येणे. पश्चिम वारे ही एक हवामान प्रणाली आहे. भूमध्य समुद्राजवळ तयार होणारे कमी दाबाचे वारे पश्चिमेकडून भारताकडे येतात. विशेषत: हे वारे हिवाळ्यात उत्तर भारतात पाऊस, ढगाळ वातावरण आणि हिमवृष्टी घडवून आणतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात पश्चिम वारे अधिक सक्रिय राहतात; परंतु हेच वारे आता कमकुवत राहताना दिसत आहे. भारतातील हवामान खात्याच्या मते, पश्चिम वारे सक्षम नसल्याने डिसेंबरमध्ये उत्तराखंडमध्ये सर्व जिल्ह्यांत असून नसल्यासारखा बर्फ होता. गढवालमध्ये यावर्षी जानेवारीत बर्फ पडलाच नाही. गेल्या चार दशकांत प्रथमच असा अनुभव आला. कमी हिमवृष्टीमुळे जटामांसी आणि कुटकीसारखे महत्त्वाच्या आयुर्वेदिक वनस्पती नाहीशा होत आहेत. आयआयटी मंडीचे सिव्हिल आणि पर्यावरण इंजिनिअरिंग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक गुप्ता यांच्या मते, हिमालयाचा भाग वेगाने उष्ण होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयाच्या वरच्या भागातही तापमान वाढत आहे. दुसरीकडे हिवाळ्यात पश्चिम वारे कमी वाहत असून प्रमाणही कमी आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे पर्वतावर गोठलेला बर्फ लवकर वितळत आहे. मर्यादित प्रमाणात पश्चिम वारे येतात तेव्हा तेथे बर्फ पाडण्याऐवजी पाऊसच पडताना दिसत आहे. त्यामुळे हिमवृष्टीचा कालावधी कमी होत आहे. हिमालय भागातील स्नो ड्रॉट किंवा बर्फाचा दुष्काळ जाणवत आहे. प्रामुख्याने तीन हजार ते सहा हजार मीटरवरच्या उंचीवरच्या क्षेत्रात हा प्रभाव सर्वाधिक पाहावयास मिळत आहे. हेमंत सिंह म्हणतात, मी गेल्या वर्षी हिमाचलच्या अटल बोगद्यात गेलो होतो. तेथे एका नागरिकाने सांगितल्यानुसार, जानेवारीत या ठिकाणी केवळ दहा ते पंधरा सेंटिमीटरच बर्फ पडला. पण दहा-पंधरा वर्षांपूर्वी तेथे किमान पंधरा मीटरपर्यंत बर्फ जमा होत असे. आता हिमवृष्टीच्या ठिकाणी वणवे पेटत आहेत, ढगफुटी किंवा भूस्खलनासारख्या घटना घडत आहेत. शेतजमीन कमी होत आहे. याक सारख्या प्राण्यांची प्रजनन पद्धत बदलत आहे. या संकटावर मार्ग आयआयटी जम्मूतील सहयोगी प्राध्यापक डॉ. दिव्येश वराडे म्हणतात, कमी बर्फाचा नकारात्मक परिणाम हा कृषी, हायड्रोपॉवर, नदीतील पाण्याचे प्रमाण, स्थानिक समुदायावर दिसत आहे. त्यामुळे तातडीने हालचाली करणे अपेक्षित आहे. सरकारने उपग्रहाच्या मदतीने या भागावर लक्ष ठेवायला हवे. भूस्खलन आणि महापुराचा इशारा देणारी प्रणाली स्थापन करायला हवी. त्याचवेळी शेतकर्यांना देखील कमी बर्फ आणि शेतीचे कमी होणार्या क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहणे आवश्यक आहे.