भागलपूर : बिहारच्या भागलपूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कौतुक केले आणि लालू यादव यांच्यावर निशाणा साधला व आपल्या सरकारने गेल्या वर्षांत राज्यात काय सुधारणा केल्यात याची माहिती दिली. पंतप्रधानांनीही याच कार्यक्रमात नितीश कुमार यांची प्रशंसा करताना ते आपले लाडके असल्याचे म्हटले होते. नितीश कुमार म्हणाले की, २००५ पूर्वी बिहारमधील परिस्थिती खूपच वाईट होती, पाटण्यातही फक्त ८ तास वीज होती. पूर्वी लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. आम्ही समाजातील प्रत्येकासाठी काम करतो. बिहारच्या विकासात मोदीजींचे सहकार्य मिळत आहे. बिहारमध्ये आता हिंदू-मुस्लिम संघर्ष होत नाही. नितीश म्हणाले की, आम्ही २४ नोव्हेंबर २००५ रोजी पहिल्यांदाच येथे सत्तेत आलो. त्या वेळी संध्याकाळनंतर कोणीही घराबाहेर पडत नसे. परिस्थिती वाईट होती. समाजात खूप वादविवाद झाले. शिक्षण आणि उपचारांची परिस्थिती वाईट होती. पटना ही राजधानी होती पण तरीही तिथे फक्त ८ तास वीज होती. मात्र आता स्थिती बदलली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील म्ही समाजातील प्रत्येकासाठी काम करतो. दरम्यान, बिहारमध्येच काल किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता जारी करण्यात आला. त्यामुळे या वर्षात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने शंखनाद केल्याचे मानले जाते आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांनीही बिहार दौरे पूर्ण केले असल्यामुळे निवडणुकीचा ज्वर तापू लागला आहे.