Pune District : राष्ट्रवादीत येणाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊ : अजित पवार ; दौंडमध्ये भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल

दौंड : सरकार येत असते जात असते, सगळेच जण त्याच ठिकाणी राहतात असे नाही. जसे चार दिवस सासूचे असतात तसेच चार दिवस सुनेचे सुद्धा येतात. त्यामुळे आपण कधीही सत्ता असली म्हणून मस्ती दाखवू नये. सत्ता नसली तरी ना उमेद होऊ नये. नव्याने पक्षात आलेल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस मान सन्मानाची वागणूक देणार आहे. आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, अशी वेळ माझ्यासहित कोणीही तुमच्यावर येऊ देणार नाही, हा शब्द मी देतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या जाहीर प्रवेश सोहळा व संवाद मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, महेश भागवत, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दौंड भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्निल शहा, माजी नगरसेवक नंदू पवार, मनोज फडतरे व इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पवार म्हणाले की, दौंड एक महत्त्वाचे जंक्शन आहे. नवीन पिढी व्यापारात आली आहे. रेल्वेचे चांगले साधन आहे. त्यामुळे सर्वांचा विचार केला तर शहरामध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. काही लोकांकडून म्हटले जाते की, बारामतीचा विकास व इतर शहर भकास. असे बिलकुल नाही. मी सर्वांना मदत करतो. शहराला झालेल्या मदतीमधील पैशाचा योग्यरित्या खर्च झाला पाहिजे तरच शहराचा विकास होतो. दौंड तालुक्यातील अनेक रस्त्यांना मी निधी दिलेला आहे. पीएमआरडीए खात्याचा निधी सुद्धा दौंड तालुक्याला आला आहे. अष्टविनायक गणपतीसाठी दीडशे कोटी रुपये आपण खर्च करीत आहोत. योग्य कामाला योग्य ठिकाणी पैसे देण्याची आमची तयारी असते.
बारामती आणि दौंड वेगळी शहरे नव्हती. आम्ही तालुक्यात शैक्षणिक संस्था काढल्या. शहरात जर कोणाला काही नवीन सुरू करावयाचे असेल तर मी राजकारण मध्ये न आणता त्यांना मदत केली. केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना आहेत. त्या योजना आणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे लागते तरच शहराचा विकास दिसेल असेही अजित पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे औचित्य साधत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वप्निल शहा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 55 हजार 555 रुपयांचा धनादेश अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
विरोधकांनाही चिमटा
पवार यांनी दौंड शहर आणि तालुक्यात जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा उल्लेख यावेळी केला. हा धागा पकडत त्यांनी सत्तेत असलेल्या आणि सध्या तालुक्यात विरोधक असलेल्या नेत्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला. पोलीस प्रशासनाविषयी बोलताना पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा, घटनेचा आदर करून पोलिसांनी काम करावे. निरपराध लोकांना त्रास देऊ नये, फार काळ ते सहन केले जात नाही, हे पोलीस प्रशासनाने ध्यानात घ्यावे.





