मुंबई : मातृभाषेचे आणि मातीचे प्रेम रक्तात असावे लागते. आमच्या डोळ्यादेखत जर कुणी मुंबईचे लचके तोडणार असेल, तर आम्ही ठाकरे गप्प बसणार नाही. आम्ही आमच्यातील सर्व वाद गाडून आता मराठी माणसाच्या हितासाठी एक ताकद म्हणून उभे ठाकलो आहोत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचे हिंदुत्व, अदानींचे हितसंबंध आणि मुंबईतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी आचार्य अत्रे, एस. एम. जोशी आणि प्रबोधनकार ठाकरे लढत होते, तेव्हा जनसंघ कुठेच नव्हता. जनसंघ केवळ घरं पेटवून स्वतःच्या पोळ्या भाजणारा पक्ष आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते, मात्र जनसंघ त्यात सर्वात शेवटी सामील झाला आणि सर्वात आधी बाहेर पडला, असा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, भाजपचे हिंदुत्व आणि देशप्रेम हे निव्वळ ढोंग आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हे लोक ऑपरेशन सिंदूरची भाषा करतात आणि दुसरीकडे अमित शहा यांचे सुपुत्र पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळवतात; हेच का तुमचे हिंदुत्व? असा सवाल त्यांनी विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला ही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, देवेंद्रजी, तुम्ही मला विकासावर बोलल्याचे दाखवून एक लाख रुपये देण्याचे आव्हान दिले होते, पण मला चोराचा पैसा नको. मी तुम्हाला आव्हान देतो की, वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम हा मुद्दा न आणता केलेले तुमचे एखादे भाषण दाखवा, मी तुम्हाला एक लाख रुपये देतो. मुंबईच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी आरोप केला की, शिवसेनेच्या काळात महापालिकेच्या ज्या ठेवी ९२ हजार कोटींपर्यंत होत्या, त्या आज ७० हजार कोटींवर आल्या आहेत. भाजपने आणि गद्दारांनी मिळून ३ लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत, मुंबई आता अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचे मूळ अनिर्बंध बांधकामात असून, या कामांसाठी वापरले जाणारे ७० टक्के सिमेंट हे अदानींच्या कंपन्यांकडूनच येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.शेवटी, तुम्ही मोदींचे केवळ बँडवाले आहात, आमचा ब्रँड तुम्ही कधीच संपवू शकणार नाही, असे ठणकावून सांगतानाच ठाकरे आणि पवार ही दोन नावे पुसून मराठी माणसाला हतबल करण्याचा भाजपचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.