इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने संबंध सुधारणे अपेक्षित होते. मात्र, शेजारील देश भारताच्या विरोधात सातत्याने विष ओकत आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीरने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली असून, मुस्लिम देशांच्या सुरक्षेच्या नावाखाली एक नवीन ‘डिफेंस डॉक्ट्रिन’ (संरक्षण धोरण) सादर केले आहे. काय आहे मुनीरचा नवा प्लॅन? या नव्या धोरणांतर्गत पाकिस्तान मुस्लिम देशांशी आक्रमक संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी वाढवत आहे. यामध्ये शस्त्रास्त्रांचे मोठे सौदे, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांची विक्री यांचा समावेश आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांच्या मते, जगातील अनेक मुस्लिम देश पाकिस्तानच्या ‘परमाणु छत्रछायेखाली’ येण्यास उत्सुक आहेत. जगात पाकिस्तान हा एकमेव अण्वस्त्रधारी इस्लामिक देश असल्याने, ज्या देशांना इस्रायल किंवा अन्य शत्रूंचा धोका आहे, त्यांना मदत करण्याचे आश्वासन मुनीरने दिले आहे. संरक्षण निर्यातीतून ८ अब्ज डॉलर्सची कमाई मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे मध्य पूर्वेतील सत्तेचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सांगितले की, जवळपास ८ मुस्लिम देश पाकिस्तानसोबत लष्करी सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पाकिस्तानला ८ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांच्या ऑर्डर्स मिळाल्या असून, पुढील ५ वर्षांत हे लक्ष्य २० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे त्यांचे नियोजन आहे. भारतासाठी चिंतेची बाब आसिम मुनीरने चिथावणीखोर विधान करताना म्हटले आहे की, “येणाऱ्या काळात अर्ध्या हिंदुस्थानला घेऊन बुडू.” भारताच्या संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान आपल्या अंतर्गत आर्थिक कमकुवतपणाला लपवण्यासाठी अशा प्रकारे बाह्य विस्तारवादावर भर देत आहे. पाकिस्तानची वाढती लष्करी पोहोच आणि मुनीरची आक्रमक विधाने भविष्यात प्रादेशिक शांततेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतात.