Mojtaba Khamenei : इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी आपले पहिले अधिकृत विधान जारी केले. सरकारी टेलिव्हिजनवरून प्रसारित करण्यात आलेल्या या निवेदनात त्यांनी शत्रू राष्ट्रांना कडक इशारा देत युद्धाची धार अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, खामेनी स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपली पकड घट्ट करून त्याचा फायदा उठवला पाहिजे. तसेच, शेजारील आखाती देशांवरील हल्ले सुरूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांची भरपाई द्यावी, अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करून किंवा नष्ट करून इराण आपला बदला घेईल, असा इशारा त्यांनी दिला. युद्धात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ त्यांनी घेतली. इराणने ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यामुळे गुरुवारी कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण प्रत्यक्षात नष्ट झाल्याचा दावा केला असला, तरी इराणने २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेला बॉम्बहल्ला थांबवण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान करण्याचे धोरण अवलंबले आहे.