सोलापूर : भाजप स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवते, मात्र आता त्या पक्षात कोणताही फरक राहिलेला नाही. आम्हीच त्यांना सत्तेत बसवले होते. आम्ही जिकडे असतो, तिकडे पारडे जड असते. वेळ आली तर आम्ही काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरवू अशी घाणाघाती टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी जाणकर आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपचे स्थानिक आमदार सुभाष व विजयकुमार देशमुखांवर देखील टीका केली. सध्या दोन्ही नेते राजकियदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. जर आमदारांची अशी अवस्था असेल तर सामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था असणार आहे ? भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. जाणकर पुढे म्हणाले की, भाजपमध्ये ओरिजनल कार्यकर्त्यांना स्थानच राहिलेले नाही. कॉंग्रेसमधून आलेले लोकच सत्तेचा उपभोग घेत आहेत. भाजप ही कॉंग्रेस झालेली नाही तर कॉंग्रेसचे कार्यकर्तेच भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना केवळ सतरंज्या उचलण्याचे काम राहिले आहे, असा टोला देखील जानकरांनी लगावला. हीच भाजपची रणनिती सध्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे कोणतीच विचारधारा राहिलेली नाही. त्यांच्या डोक्यात केवळ सत्ता कशी टिकवायची ? पैसा कसा टिकवायचा ? एवढेच विचार आहेत. लोकांची काळजी न करता केवळ सत्ताकारण करणे हेच भाजपचे काम आहे. देशात केवळ दोनच पक्ष रहावेत, हीच भाजपची रणनिती आहे. मात्र आमचा पक्ष अजूनही लढवय्या भूमिकेत असल्याचे जानकर यांनी बोलताना स्पष्ट केले. आजच्या जानकरांच्या वक्तव्यामुळे राजकिय वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.