पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव करू

नवाब मलिक: छत्रपतींच्या जमिनी विकण्याची परवानगी मिळवण्यासाठीच भाजपात प्रवेश
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरीता परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सातारा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव होईल.

उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला. छत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे यांना परवानगी देण्याचे आमिष भाजपने दाखवले असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशारा देतानाच शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे. त्याला जर कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन आम्ही कडाडून विरोध करू, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.

उदयनराजे भोसले हे 1999 पूर्वी भाजपचे आमदार व मंत्री होते. 1999च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचा पराभव केला होता. नंतर ते त्यांच्या आईच्या माध्यमातून शरद पवार साहेबांना भेटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना खासदार केले. त्यांना खासदार केल्यानंतरही ते वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होते. निवडणुका जवळ आल्या की, ते पुन्हा आईच्या माध्यमातून पवार साहेबांना भेटायचे. तिकीट मिळवायचे आणि पुन्हा निवडून यायचे अशी मिश्‍किल टिप्पणी नवाब मलिक यांनी केली.

सातारा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव होईल. 1999 च्या पराभवाची त्यांना आठवण करून देऊ. ते कुठल्या पद्धतीने कामे करतात. रात्री व दिवसा कुठल्या अवस्थेत असतात हे सातारा जिल्ह्यातील जनतेला माहित आहे. जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी ती जागा आम्ही निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतातील राजे, संस्थानिक यांना भाजपमध्ये आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी काही माणसे सोडली आहेत. सातारा किंवा अन्य कोणत्याही संस्थानांतील जमिनी कायद्याने विकता येत नाहीत. स्वतःसाठी वापरता येत नाहीत. भाजप सरकार या जागा विकण्याच्या आमिषापोटी राजे, संस्थानिकांना भाजपमध्ये आणत आहेत. उदयनराजे हे सुद्धा याच आमिषाने भाजपमध्ये गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी अबाधित राहिल्या पाहिजेत. त्यामुळे उदयनराजे जेव्हा केव्हा ते निवडणूक लढवतील तेव्हा आम्ही त्यांना पराभूत करू, असेही नवाब मलिक म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here