भाजप नेते बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली
मुंबई : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत, असे संतापजनक विधान राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केले आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना लोणीकर यांची जीभ घसरली. लोणीकर यांच्या भाषणाची क्लिप सगळीकडं व्हायरल होत असून, विरोधकांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलेल्या भाषणाची ऑडियो क्लिप सोशल माध्यमातून समोर आली. या भाषणात बोलताना लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा सर्वात मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन उपस्थितांना केले. विशेष म्हणजे मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी एखादी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि जर कुणी भेटले नाही, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्या निवेदन घ्यायला येतील, असे विधान लोणीकरांनी केले आहे.
लोणीकरांच्या या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादीने लोणीकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. बबनराव लोणीकरांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. भाजपाची संस्कृती रसातळाला गेली आहे. महिला अधिकाऱ्याचा सन्मान करणं आवश्यक आहे. एका महिलेबाबत असं वक्तव्य करणं विनयभंगाचा गुन्हा आहे, असे राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनीही लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषध केला आहे.