मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नैतिक जबाबदारी म्हणून सरकारमधील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी राजीनामा दिला. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा घेतल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातून म्हटलं आहे. यानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून नैतिकता कुठे होती? असा सवाल करत विरोधकांनी सरकारवर टीका केली. नाना पटोलेंचा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती थेट माध्यमांना दिली. पण, सभागृहाला दिली नाही. गेल्या अधिवेशनात नागपुरात जे काही बोलले ते खोट होतं, अजून किती लपवणार. गृहखात्याकडे ही माहिती नव्हती का, गृहखात्याने ही माहिती का लपवली, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. संतोष देशमुख प्रकरणात गुन्हेगाराला वाचवण्याचं काम सरकार करत होते, हे सरकार देखील सहआरोपी आहे. या सरकारला हिशोब द्यावा लागणार, असेदेखील नाना पटोले म्हणाले. CM फडणवीसांवर हक्कभंग आणणार मुख्यमंत्री रात्री ताफा घेऊन अजित पवारांना भेटायला जातात, राजीनामा लिहून घेतात. राजीनामा आल्यानंतर त्यांनी थेट माध्यमांना येऊन सांगितलं. पण, नियमानुसार मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला त्याबाबत सांगणं अपेक्षित होतं. त्यामुळे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे उद्या सभागृहात काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.