तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – भारतीय जनता पार्टी पक्षाने मावळच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. हा निर्णय जाहीर झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी सांगितले. सोमवारी (दि.२१) रात्री तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे यांनी हे वक्तव्य केले. पत्रकार परिषदेला रविंद्र भेगडे यांसह माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार हे उपस्थित होते. रविंद्र भेगडे हे मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या रिंगणात असतील का? याबाबत भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच सोमवारी पत्रकार परिषदेत रविंद्र भेगडे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भेगडे यांनी पत्रकार परिषदेत कोणतीही मोठी घोषणा करण्याचे टाळले. पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारली – रविंद्र भेगडे यांनी सोमवारी तळेगाव येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच एक महत्वाची माहिती माध्यमांना दिली. पक्षाने रविंद्र भेगडे यांना विधानसभा निवडणूकीसाठी ‘मावळ विधानसभा समन्वयक’ ह्या पदाची जबाबदारी देऊ केली होती, ती जबाबदारी भेगडे यांनी स्विकारली नाही. भेगडे यांनी पक्षाने देऊ केलेले हे पद आणि जबाबदारी नाकारली असून पक्षाने आता अशा पद, जबाबदाऱ्यांऐवजी मी मावळची उमेदवारी मागत आहे, ती उमेदवारी द्यावी, असे स्पष्टपणे सांगितले.