चीनला खुमखुमी असल्यास कायमच धडा शिकवू; आठवले आक्रमक

नवी दिल्ली: भारताने चीनला बुद्ध दिला आहे, युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील. भारतात करोनाशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे.
करोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू, असा विश्वास व्यक्त करत रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दंड थोपटले. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे त्यांनी आवाहनही केले.
रामदास आठवले म्हणाले, चीन हा एक कपट करणारा देश आहे. भारताने सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. चिनी खाद्यपदार्थ व चिनी पदार्थांची हॉटेल्सही बंद केली पाहिजेत. भारताने चीनला बुद्ध दिला आहे, युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल, तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील.
दरम्यान, गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद जवानांना रामदास आठवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना विनम्र श्रद्धांजली! जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. भारत सरकार आणि सर्व भारतीय शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेत उभे आहेत! अशा शब्दात आठवले यांनी आदरांजली व्यक्त केली.





